वाळूमाफियांना दणका : चौघांवर गुन्हे दाखल, तस्करांचे धाबे दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 04:15 AM2017-08-24T04:15:29+5:302017-08-24T04:15:33+5:30
पुणे व नगर परिसरात वाळूतस्करी करणाºयांना अखेर दणका बसला आहे. अवैध वाळूतस्करी प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तीन पोकलेन, एक जेसीबी मशीन जप्त केले आहे.
- संजय बारहाते ।
टाकळीहाजी : पुणे व नगर परिसरात वाळूतस्करी करणाºयांना अखेर दणका बसला आहे. अवैध वाळूतस्करी प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तीन पोकलेन, एक जेसीबी मशीन जप्त केले आहे. एकूण ४८ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी गणेश शिवराम पाचर्णे, मुकुंद शिवराम भुजबळ (रा. शिरूर) भालचंद्र जनार्दन फुलसुंदर, गणेश बाळू लंके (रा. निघोज ता. पारनेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर तालुक्यातील टाकळीहाजीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पारनेर तालुक्यातील ढवणवाडी येथील कुकडी नदी व परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळूतस्करी होत होती. वाळूतस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी नगर जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व जिल्हाधिकारी अभय महाजन
यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथकाने मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
या भागात सुरू असलेल्या वाळूतस्करीच्या संबंधात ‘लोकमत’ने वाचा फोडली होती.
अनेक दिवसांपासून वाळूची तस्करी होत होती. टाकळीहाजी परिसरातील माळवाडी रस्त्याने हीच वाळू पुणे-मुंबईकडे जात होती. किमान तीन कोटींची वाळूतस्करी झाली असल्याचा ग्रामस्थांचा अंदाज आहे. या भागातील रस्ते नुकतेच चांगले करण्यात आले आहेत; मात्र या वाळूवाहतुकीने हे रस्ते खराब होत असल्याची तक्रार शिरूर तहसीदार यांच्याकडे ग्रामस्थांनी केली होती. मात्र, वाळवाहतूक करणाºयांवर या अधिकाºयांनी कोणतीही कारवाई केली नाही.
अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, आनंद भोयटे व पारनेरचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
बेसुमार उपशाने नदीपात्रात खड्डे...
राजकीय हितसंबंध दाखवून अथवा वाळू उपसण्याचा नगर जिल्ह्याचा रीतसर परवाना घेतल्याची खोटी माहिती देऊन हे वाळूतस्करी करणारे ग्रामस्थांना धमकावीत होते. कुकडीच्या नदीपात्रात या वाळूतस्करांनी सात ते आठ पोकलेन व जेसीबीच्या माध्यमातून दररोज पन्नास ते साठ ट्रक वाळूउपसा करीत होते. त्यामुळे या नदीपात्रात २५ ते ५० फुटांचे खड्डे तयार झाले आहेत.
‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश...
अनेक दिवसांपासून या परिसरात वाळूतस्करी सुरू असल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी पारनेरच्या तहसीदार भारती सागरे व नगरचे प्रांत गोविंद दाणेज यांना दिली होती. निघोज येथे झालेल्या ग्रामसभेत ढवणवाडी येथील वाळूतस्करी बंद करण्याचा ठराव व वाळूतस्करांवर कारवाई करण्यासाठी संबंधित अधिकाºयांना या ठरावाच्या प्रती पाठवण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला होता. ‘लोकमत’ने ही वाळूतस्करी बंद करण्यासाठी पाठपुरावा केला होता .