व्हॉट्स अॅपमुळे मिळाला वाबळे घराण्याच्या इतिहासाला उजाळा
By Admin | Published: May 12, 2016 01:22 AM2016-05-12T01:22:55+5:302016-05-12T01:22:55+5:30
मुढाळे (ता. बारामती) येथील तरुणांनी व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून विविध भागांत विखुरलेल्या आपल्या वाबळे परिवारातील सदस्यांना रविवारी (दि. ८) शिवजयंतीदिनी एकत्र केले
वडगाव निंबाळकर : मुढाळे (ता. बारामती) येथील तरुणांनी व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून विविध भागांत विखुरलेल्या आपल्या वाबळे परिवारातील सदस्यांना रविवारी (दि. ८) शिवजयंतीदिनी एकत्र केले. त्यांचा एकमेकांशी संवाद झाल्याने विविध भागांतून सुमारे पाचशे जण एकत्र आले. त्यामुळे पानिपतच्या युद्धात शौर्य गाजवणाऱ्या सरदार जानराव वाबळे यांचा इतिहास त्यांच्या वारसांच्या पुढे आला.
एकत्रित आलेल्या वाबळे घराण्यातील सदस्यांनी आपल्या घराण्याच्या इतिहासावर चर्चा केली. यातून पानिपतच्या युद्धात सरदार जानराव वाबळे यांनी तीन हजार सैन्याचे नेतृत्व केल्याचे ऐतिहासिक दाखले जाणकारांनी आपल्या भाषणातून सांगितले. यामुळे उपस्थितांना माहीत नसलेला आपल्या घराण्याचा इतिहास कळाला.
येथील वाबळे घराण्यातील अक्षय, अजिंक्य, अनिकेत, अजान, सूरज, दत्तात्रय, मनोज यांनी एकत्र येऊन तीन वर्षांपूर्वी सरदार वाबळे परिवार ग्रुप तयार केला. सदस्यसंख्या वाढत गेली. त्यामुळे तीन ग्रुपच्या माध्यमातून साडेसातशे जण एकमेकांच्या संपर्कात आले.
आपण कार्यक्रम घेऊन आपल्या मूळ गावी मुढाळे येथे भेटू, असे ठरले आणि बघता बघता शिवजयंतीचे औचित्य साधून सर्व जण एकत्र आले. माळेगाव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक विजय वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
या वेळी पिंपरी-चिंचवड नगरपालिकेचे नगरसेवक संजय वाबळे, मनोहर वाबळे, हनुमंत वाबळे यांच्यासह वाबळे आडनावाचे साहेबराव, राजेश, विलास, मनसुब, बाळासोा, शामराव, रमेश प्रमुख सदस्य उपस्थित होते. संजय वाबळे यांनी सूत्रसंचालन केले. वसंत वाबळे यांनी प्रास्ताविक केले. उषा वाबळे यांनी आभार मानले. मुढाळे येथील नागरिकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.