‘स्वरभास्करा’ला वाहिली रसिकांनी शब्दरूपी सुमनांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 03:02 AM2018-12-15T03:02:37+5:302018-12-15T03:02:46+5:30
लेखनातून घडविले पंडितजींच्या कार्यकर्तृत्वाचे दर्शन
पुणे : भारतीय अभिजात संगीत दरबारातील एक रत्न म्हणजे ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी. आजवर पंडितजींच्या व्यक्तिमत्वामधील विभिन्न पैलूंवर शिष्यगणांसह प्रथितयश कलाकारांनी विवेचन केले आहे. मात्र पंडितजींच्या शिष्याकडूनच संगीताचे धडे घेतलेल्या पं. नागराज राव हवालदार यांनी ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी-द व्हॉईस आॅफ पीपल’या इंग्रजी पुस्तकाद्वारे ‘स्वरभास्करा’कर्तृत्वाचे दर्शन घडवित त्यांना ‘शब्दसुमनांजली’ वाहिली आहे.
अंगमेहनतीची कामे करून गुरु पं. सवाई गंधर्व यांच्याकडून विद्याध्ययन करणारे शिष्य... घराण्याच्या तालमीतून आपली स्वतंत्र शैली निर्माण करणारे गायक... उत्तम गायक घडविणारे गुरु... पंडितजींची राग सादरीकरणाची पद्धत, त्यावरचे चिंतन, अशा रूपात पंडितजींची सांगीतिक कारकिर्द पुस्तकाद्वारे उलगडली आहे. तब्बल साडेतीन दशकांनंतर पं. भीमसेन जोशी यांच्यावर इंग्रजीमधील दुसरे पुस्तक वाचकांच्या भेटीला आले आहे. पं. नागराज राव हवालदार यांच्या पाच वर्षांच्या प्रयत्नांतून हे पुस्तक आकाराला आले आहे. नागराज राव हवालदार हे पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. माधव गुडी यांचे शिष्य आहेत.
ज्येष्ठ कला समीक्षक मोहन नाडकर्णी यांचे ‘द मॅन अँड हिज म्युझिक’ हे पुस्तक १९८४ मध्ये प्रकाशित झाले होते. त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांच्या कारकिर्दीचा बहराचा कालखंड सुरू झाला. त्यांच्या व्यक्तित्व व कर्तृत्वाचा वेध घेणारे लेखन इंग्रजीमध्ये झालेले नाही. याच जाणीवेतून ‘आजोबाला नातवाचे अभिवादन’ करण्याच्या उद्देशातून हे लेखन केले असल्याचे नागराज राव हवालदार यांनी सांगितले.
वयाच्या पाचव्या वर्षी धारवाड आकाशवाणीवर प्रसारित झालेले ‘संध्या राग’ या कन्नड चित्रपटातील पंडितजींचे गीत ऐकले आणि त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडलो. १९८४ मध्ये त्यांची भेट घेऊन गायन शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. मात्र, त्यावेळी पंडितजी यांची कारकिर्द भरामध्ये होती.
या पुस्तकामध्ये पं. भीमसेन जोशी यांच्या गुरुभगिनी गंगुबाई हनगल, मंगलोर येथील बालमित्र आणि तबलावादक दत्तात्रय गरुड, नाना मुळे, पाश्र्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ‘अनकही’ चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल पालेकर, पंडितजींचे शिष्य आणि कुटुंबीय यांनी ‘स्वरभास्करा’च्या सांगितलेल्या आठवणींचा समावेश आहे. याशिवाय पंडितजी रागाची मांडणी कशा प्रकारे करतात, त्यामागची पद्धत, रागांकडे पाहाण्याची दृष्टी यावर देखील प्रकाश टाकण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.