शब्द सुधीर मोघेंना शरण यायचे : डॉ. वीणा देव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 06:46 PM2018-04-10T18:46:04+5:302018-04-10T18:46:04+5:30
सुधीर मोघे शब्दांमागचा भाव पोहचवण्यासाठी आग्रही असायचे.
पुणे : सुधीर मोघे म्हणजे ऊर्जा देणारे व्यक्तिमत्त्व होते. कविता कशी सादर करायची, कोणत्या शब्दांवर कसा जोर द्यायचा याबाबतच्या त्यांच्या सुचना समृद्ध करणा-या असायच्या. शब्दांमागचा भाव पोहचवण्यासाठी ते आग्रही असायचे. अभिजाततेचा संस्कार त्याला घरातूनच मिळाला होता. मोघेंना शब्द शरण यायचे. त्यांनी प्रत्येक वेळी सृजनता, प्रयोगशीलता जपली, अशा शब्दांत ज्येष्ठ लेखिका डॉ.वीणा देव यांनी आठवणींना उजाळा दिला.
कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे संदीप खरे यांनी संपादित केलेल्या ‘आरसपानी: निवडक सुधीर मोघे’ या पुस्तकाचे प्रकाशन वीणा देव यांच्या हस्ते झाले. यावेळी संदीप खरे, शुभदा मोघे, प्रकाशिका अमृता कुलकर्णी आणि ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम उपस्थित होते.
देव म्हणाल्या, ‘मोघे यांचे निर्मितीचे उन्मेष, अनुभवसंपन्नता आणि विविध कलांमध्ये त्यांचं रमणे याचा अनुभव मी अनेकदा घेतला. कविता आणि गीतलेखन यातील सीमारेषा आणि बलस्थाने याची त्यांना जाण होती. प्रयोगशीलतेचा स्वीकार करण्याची त्यांची तयारी असायची. या शब्दवेड्या माणसाने कवितेची पालखी पुढे नेली आणि हा ध्वज नव्या पिढीमध्ये संदीप खरे नाचता ठेवत आहे.’
खरे म्हणाले, ‘कवी असण्याचा कोणताही अभिनिवेश सुधीर मोघे सरांनी बाळगला नाही. त्यांचे सर्वांशी खूप छान बोलणे मनाला भिडायचे आणि त्यातून मैत्र जडले गेले. वयाने मोठे असले तरी मोघे हा माणूस यार वाटला. कलाकारापेक्षाही मोघे यांच्यातील रसिकत्व मोठे होते. त्यांच्या वागण्या-बोलण्यात नैसर्गिक सहजता होती. ते खºया अर्थाने आरसपानी होते. त्यांचं निरंकुश जगणं बेगडी वाटलं नाही. गीत सादर करताना त्यामागचा संगीतकार, कविता सादर करताना रसिकांना जिंकणारे कवी, निसगार्ची विविध रूपे कुंचल्याद्वारे रेखाटणारे चित्रकार असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे नाना रंग फुलून यायचे.’
अमृता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अवधूत पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.
.....................