भामा आसखेड योजनेचे काम शंभर टक्के पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:00 AM2020-12-02T04:00:01+5:302020-12-02T04:00:01+5:30
येरवडा : गेल्या जवळपास सात वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे काम शनिवारी मध्यरात्री शंभर टक्के पुर्ण झाले. येत्या ...
येरवडा : गेल्या जवळपास सात वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे काम शनिवारी मध्यरात्री शंभर टक्के पुर्ण झाले. येत्या १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष पाणी पुरवठ्याच्या चाचणीस सुरवात होणार आहे. त्यानंतर हे पाणी थेट वडगावशेरीतील नागरिकांच्या घरात पोहचणार असल्याची माहिती आमदार सुनील टिंगरे यांनी दिली.
शहराच्या पूर्व भागातील प्रामुख्याने वडगावशेरी, चंदनगर, खराडी, विमाननगर, कल्याणीनगर, येरवडा, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव या भागाचा पाणी पुरवठ्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेकडून भामा आसखेड पाणी पुरवठा योजना हाती घेतली. या योजनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या काळात जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून ३८० कोटींचा निधी मंजूर केला होता. सन २०१३ रोजी सुरू केलेल्या या योजनेचे काम डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह विविध ठिकाणी जलवाहिनीचे काम अडविल्याने या योजनेचे काम बंद होते.
दहा दिवस होणार चाचणी
गेल्या आठ महिन्यात प्रामुख्याने आसखेड गाव येथील एक किमीच्या जलवाहिनीसह चिंबळी, कुरुळी, केळगाव, चऱ्होली याठिकाणीची जलवाहिनीची तसेच जलशुद्धीकरण केंद्रातील कामे मार्गी लावली. शनिवारी मध्यरात्री दोन वाजता केळगाव येथील जलवाहिनीचे काम पूर्ण करत या योजनेचे शंभर टक्के काम पूर्ण झाल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले. येत्या मंगळवारपासून या योजनेतून प्रत्यक्ष पाणी पुरवठ्याच्या चाचणीस सुरवात होईल. दहा दिवस ही चाचणी होणार आहे.
---
आम्ही दिलेला शब्द पूर्ण केला
विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी मतदारसंघाचा पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीला या योजनेचे काम आणि दिलेली आश्वासनपूर्ती होत आहे याचा आनंद होत आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री अजित पवार यांच्यासह प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा केला.
- सुनील टिंगरे, आमदार, वडगाव शेरी