भोर जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:11 AM2021-02-13T04:11:09+5:302021-02-13T04:11:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भोर: नगरपलिकेच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाचे काम रखडल्याने मागील ११ महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे नगरपलिकेने ...

Work on Bhor water purification project stalled | भोर जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम रखडले

भोर जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम रखडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

भोर: नगरपलिकेच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाचे काम रखडल्याने मागील ११ महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे नगरपलिकेने नागरिकांकडून सहा महिन्यांचीच पाणीपट्टी घ्यावी. पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर भोर नगरपलिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.

भोरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यधिकारी डाॅ. विजयकुमार थोरात यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी शहराध्यक्ष नितीन धारणे, सुहित जाधव, हसिना शेख, कुणाल धुमाळ, किरण आंबिके, विराज नलावडे, मयुर भिसे धिरज चव्हाण, राजेंद्र शिंदे, भिलारे, चेतन जाधव, मुन्ना बागवान दनिश शेख, मयुर भालेराव उपस्थित होते.

भोर शहराला भोर नगरपलिकेकडून मागिल ११ महिन्यांपासून दिवसाआड तर काही भागात कमी दाबाने व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. ही गोष्ट गंभीर आणि धोकादायक आहे. यात सुधारणा होणे गरजेचे आहे. मात्र, शहराला दिवसाआड म्हणजे सहा महिनेच पाणीपुरवठा होतो. तरीही पाणीपट्टी एक वर्षाची घेतली जाते. त्यामुळे एकतर पाणीपुरवठा नियमितपणे करावा, अन्यथा सहा महिन्यांचीच पाणीपट्टी घ्यावी, अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसने केली. भोर शहराला स्वच्छ आणि नियमितपणे पाणीपुरवठा केला नाही तर पुढील आठ दिवसांत भोर नगरपलिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी दिला आहे.

चौकट

भोर शहराला दररोज ३५ लाख लिटर पाणी लागते. नगरपालिकेकडे २ एमएलडी आणि दीड एमएलडी असे ३.५ एमएलडी (द.श.ल.क्ष मि.लि) पाणी फिल्टर होते. दोन फिल्टर आहेत. मात्र, पुरेशा प्रमाणात पाणी फिल्टर होत नाही. तर भोर नगरपालिकेचे नवीन फिल्टरचे काम मागील वर्षभरापासून अपूर्ण आहेत. त्यामुळे शहराला लागणारे पाणी पुरेशा प्रमाणात फिल्टर होत नाही. यामुळे मागील ११ महिन्यांपासून भोर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. तर काही भागांत कमी दाबाने आणि काही भागांत दूषित पाणीपुरवठा होतो.

चौकट

शहरातील कित्येक नळांना तोट्या नसल्यामुळे पाणी भरून झाल्यावर नळाद्वारे पाणी रस्त्यावर व गटांमध्ये सोडले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी पाणी वाया जात आहे. याशिवाय अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत आहे. यामुळे भोर नगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याकडे लक्ष घालून त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

चौकट

भोर शहराला सहा महिनेच पाणीपुरवठा, मग पाणीपट्टी वर्षाची का?

भोर नगरपलिकेकडून मागील ११ महिने दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे वर्षात सहा महिनेच पाणीपुरवठा होतो. शिवाय अनेक भागांत दूषित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. तरीही एक वर्षाची पाणीपट्टी आकारली जाते. नगरपालिकेने नागरिकांकडून सहा महिन्यांचीच पाणीपट्टी घ्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

कोट

भोर नगरपालिकेच्या जलशुद्धीकरणाचे काम अपूर्ण आहे. यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र फिल्टरचे काम पूर्ण झाल्यावर लवकरच भोरला दररोज शुद्ध पाणीपुरवठा सुरू होईल. शहरातील सर्व सर्व नळांना नगरपालिकेमार्फत तोट्या बसवल्या जातील व खाजगी नळकनेक्शनधारकांनी तोट्या बसून घेण्यासाठी सूचना देण्यात येणार आहेत. त्यानंतर मात्र नळाला तोट्या न बसवल्यास नळ कनेक्शन बंद करण्यात येणार आहे.

-डॉ. विजयकुमार थोरात, मुख्याधिकारी. भोर नगरपालिका

Web Title: Work on Bhor water purification project stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.