जुन्या कालव्यावरील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:11 AM2021-03-07T04:11:55+5:302021-03-07T04:11:55+5:30
उरुळी कांचन: उरुळी कांचन ते श्रीक्षेत्र डाळिंब ( ता.दौंड) कडे पांढरस्थळवस्ती मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील जुन्या मुठा कालव्यावरील पुलाचे ...
उरुळी कांचन: उरुळी कांचन ते श्रीक्षेत्र डाळिंब ( ता.दौंड) कडे पांढरस्थळवस्ती मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील जुन्या मुठा कालव्यावरील पुलाचे काम जलसंपदा विभागाच्या नाकर्तेपणाने व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अनेक वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहेत. या रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
डाळिंब देवस्थानकडे जाण्याचा हा मार्ग असल्याने रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. पण सध्या पुलावरील रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद असल्याने तसेच खडीचे व मुरमाचे ढीग ठिकठिकाणी पडून असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहेत, याबाबत यवत उपविभागाचे उपअभियंता शंकरराव बनकर यांचेशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की ११० मीटर लांबीच्या रस्त्याचे काम अपूर्ण व अर्धवट आहे हे मान्य आहे, पुलाचे ठेकेदार रमेश खारतोडे यांना पुलावरील ११० मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे.
याबाबत ठेकेदार रमेश खारतोडे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, येथील काही राजकीय कार्यकर्ते वाजवी पेक्षा जास्त काम करा असा आग्रह धरून काम करण्यासाठी आणलेल्या कामगारांना काम करू देत नाहीत त्यामुळे मला काम पूर्ण करण्यास उशीर होत आहे.याठिकाणी काम करताना अनेक अडचणींना सामोरे जात काम पूर्ण केले अनेक वेळा कामासाठी आणलेले मटेरीअल चोरीला जाण्याचे प्रकार घडले आहेत.
दरम्यान, उरुळी कांचन ते श्रीक्षेत्र डाळिंब या रस्त्यावरील काम वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते. ठेकेदार व अधिकारी त्यांच्या सवडीनुसार हे काम पूर्ण करण्याचे धोरण ते राबवीत आहे. जलसंपदा विभागाला हे काम पूर्ण करायचे आहे की नाही हे कळत नाही. हे काम तातडीने पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन यांनी दिला आहे.
०६ उरुळी कांचन
उरुळी कांचन ते श्रीक्षेत्र डाळिंब रस्त्याचे अर्धवट असलेले काम.