वळसेमळा ओढ्याच्या पुलाचे काम अपूर्ण
By admin | Published: March 28, 2017 02:17 AM2017-03-28T02:17:13+5:302017-03-28T02:17:13+5:30
अवसरी बुद्रुक ते निरगुडसर रस्त्यावर वळसेमळा येथील ओढ्यावरील पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला
अवसरी : अवसरी बुद्रुक ते निरगुडसर रस्त्यावर वळसेमळा येथील ओढ्यावरील पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाहनचालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
अवसरी बुद्रुक येथील वळसेमळामार्गे निरगुडसरला जाण्यासाठी एक मार्ग व दुसरा मेंगडेवाडी मार्गे रस्ता आहे. वळसेमळामार्गे गेल्यास तीन किलोमीटर अंतर कमी पडत असल्याने बहुतांशी वाहनचालक वळसेमळामार्गे निरगुडसर-भीमाशंकर साखर कारखाना शिरूरला जातात. मात्र, वळसेमळा येथील ओढ्यावर पूल नसल्याने वाहनचालक व स्थानिक ग्रामस्थांना पावसाळ्यात मोठी कसरत करत पाण्यातून ये-जा करावी लागत असे.
त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे ओढ्यावरील नवीन पूल रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी केली होती. मागणीचा विचार करून वळसे-पाटील यांनी २५ लाख रुपयांचा निधी सहा महिन्यापूर्वी मंजूर केला. लगेचेच पुलाच्या बांधकामाला सुरुवात होऊन आता पुलाचे काम पूर्ण होऊन नवीन पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
निरगुडर ते वळसेमळा या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. आता वळसेमळा ते अवसरी बुद्रुक या रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे.उर्वरित अवसरी बुद्रुक ते वळसेमळा रस्त्याच्या डांबरीकरणासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी निधी मंजूर करावा, अशी मागणी अवसरी बु. येथील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)