नवी पिढी घडवण्याचे काम आंदळकरांनी केले - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 03:01 AM2018-09-26T03:01:07+5:302018-09-26T03:01:23+5:30
सामान्य शेतकरी कुटुंबात असूनही कुस्ती क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या गणपतराव आंदळकर यांनी प्रचंड मेहनतीने देश-विदेशात यश मिळवले, तरीही त्यांचे पाय जमिनीवर होते. नव्या पिढीला प्रोत्साहन देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम सातत्याने केले.
धनकवडी - सामान्य शेतकरी कुटुंबात असूनही कुस्ती क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या गणपतराव आंदळकर यांनी प्रचंड मेहनतीने देश-विदेशात यश मिळवले, तरीही त्यांचे पाय जमिनीवर होते. नव्या पिढीला प्रोत्साहन देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम सातत्याने केले. ज्यामुळे अनेक मल्ल देशाचे नाव उज्ज्वल करीत आहेत, अशा शब्दांत आदरांजली माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी वाहिली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलामध्ये हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष या नात्याने पवार यांनी आंदळकर यांच्या कुस्ती क्षेत्रातील भरीव कामगिरीला उजाळा दिला.
पवार यांनी १९६० मध्ये दिल्लीचा खडकसिंग पंजाबी या नामवंत पैलवानाने दिलेले आव्हान आंदळकर यांनी लिलया पेलल्याची आठवण सांगितली. यावेळी आंदळकर यांचे वय होते २७ तर खडकसिंग यांचे वय होते ५४.
यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनीही श्रद्धांजली वाहिली. माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, माजी खासदार अशोक मोहोळ, काका पवार, कैलास मोहोळ, बालाजी गव्हाणे, अमोल बुचडे, दत्ताजी गायकवाड, विजय गावडे, अमोल बराटे, योगेश दोडके, संयोजक मोहोळ कुस्ती संकुलाचे कार्यवाह वस्ताद माऊली मांगडे, कृष्णा फिरंगे, सयाजी जाधव आणि स्थानिक नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे, युवराज बेलदरे यांच्यासह संतोष फरांदे, सुधीर कोंढरे, कुलदीप कोंडे, रमेश कोंडे यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अॅड. दिलीप जगताप यांनी सूत्रसंचालन केले.