गुंजवणी प्रकल्पाच्या कालव्यातून होणारे बंद पाइपलाइनचे काम शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:09 AM2021-04-29T04:09:06+5:302021-04-29T04:09:06+5:30
--- भोर : वेल्हे तालुक्यातील चापेट गुंजवणी धरणाच्या कालव्यातून होणारे बंद पाइपलाइनचे काम पूर्वीच्या सर्वेक्षणानुसार होत नाही, शिवाय शेतकऱ्यांना ...
---
भोर : वेल्हे तालुक्यातील चापेट गुंजवणी धरणाच्या कालव्यातून होणारे बंद पाइपलाइनचे काम पूर्वीच्या सर्वेक्षणानुसार होत नाही, शिवाय शेतकऱ्यांना व लोकप्रतिनिधी यांना विश्वासात न घेता सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण कामाची माहिती द्यावी आणि नंतरच काम सुरु करावे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा भोर पंचायत समितीचे उपसभापती लहू शेलार यांनी दिला. याबाबत गुंजवणी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाव्दारे अर्ज दिला आहे.
वेल्हे तालुक्यातील चापेट गुंजवणी प्रकल्पातून डावा व उजव्या कालव्यातून बंद पाइपलाइन जोडण्याचे काम चालू आहे. परंतु ही पाइपलाइन वेल्हे व भोर तालुक्यातून पुरंदर तालुक्यात जाणार आहे. पाइपलाइनचा प्रथम डोंगरपायथ्याकडून जाणार होती. तसे सर्वेक्षण करण्यात आले होते. आता मात्र अचानक उजव्या डाव्या कालव्यातून जाणारी पाइपलाइन नदीपात्राच्या शेजारून जात आहे. त्यामुळे तांबड, हातवे खुर्द, हातवे बुद्रुक, भिलारेवाडी, मोहरी बुद्रुक, मोहरी खुर्द, तेलवडी, आळंदे, आळंदेवाडी, कासुर्डीगुमा तर डाव्या कालव्यातून जाणाऱ्या बंद पाइपलाइनमुळे पारवडी, सोनवडी, कुरुंगवडी कांबरे, करंदी जांभळी या गावांच्या डोंगरपायथ्याची किती जमीन पाण्यापासून वंचित राहणार आहे हे शेतकऱ्यांना सांगितलेले नाही. त्याचबरोबर गावोगावी पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आलेल्या नाहीत. ही पाइपलाइन झाल्यानंतर ज्या जमिनीपर्यंत पाईपलाईनचे पाणी जात नाही, त्या शेतकऱ्यांच्या उपसासिंचन योजनेसाठी गुंजवणी नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे की नाही हे देखील शेतकऱ्यांना समजलेले नाही. कोणत्या गावातील किती गटांना पाणी मिळणार हे त्या त्या गावातील शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून माहिती दिलेली नाही. ती माहिती द्यावी, गुंजवणीच्या पाइपलाइन प्रकल्पाचे काम शेतकरी व स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
--
कोट
गुंजवणी प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून बंद पाइपलाइनने पाणी वेल्हे, भोर आणि पुरंदरला जाणार आहे. याबाबत सर्व गावांतील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकल्पाबाबत व पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी माहिती दिलेली आहे. पाणीवाटपात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भोर तालुक्यातील बंद पाइपलाइन गेलेल्या गावांतील सर्व गटातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिले जाणार आहे.
- दिगंबर डुबल,
कार्यकारी अभियंता, चापेट गुंजवणी प्रकल्प