गट-तट सोडून एकत्रितपणे काम करा : अजित पवार
By admin | Published: April 27, 2015 04:54 AM2015-04-27T04:54:41+5:302015-04-27T04:54:41+5:30
स्थानिक नेत्यांनी मनामध्ये असणारी अढी दूर करून, माझा मी आणि गटतट, हेवेदावे विसरून सर्वांनी एकत्रिपणे काम करायला हवे
पिंपरी : स्थानिक नेत्यांनी मनामध्ये असणारी अढी दूर करून, माझा मी आणि गटतट, हेवेदावे विसरून सर्वांनी एकत्रिपणे काम करायला हवे. माणूस मोठा नसतो, तर पक्ष मोठा असतो, ही भावना ठेवून काम करायला हवे. आपण विकास कामाचे मार्केटिंग करायला हवे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथे केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात निर्धार मेळावा घेण्यात आला. त्या वेळी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते आझम पानसरे होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, महापौर शकुंतला धराडे, माजी आमदार विलास लांडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, शहराध्यक्ष योगेश बहल, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे, शिक्षण मंडळाचे सभापती धनंजय भालेकर, सुरेखा लांडगे, मयूर कलाटे, रंगनाथ फुगे, संजोग वाघेरे, अनिता फरांदे, जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे, हनुमंत गावडे आदी उपस्थित होते.
सहा महिन्यांनंतर राज्यातील सेना-भाजपा सरकारमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. आम्ही विरोधात असलो, तरी विकासाच्या मुद्द्यावर कधीही राजकारण करणारे नाही.’’
महापालिकेत वारंवार होणाऱ्या सभा तहकुबीच्या मुद्द्यावर पवार म्हणाले, ‘‘वारंवार सर्वसाधारण सभा तहकूब करू नका. त्यामुळे विकासकामांच्या अंमलबजावणीवर परिणाम होतो.’’
भास्कर जाधव म्हणाले, ‘‘सत्तेपेक्षा संघटनेला महत्त्व असते. आपण लोकसभा, विधानसभा निवडणुकीत केवळ बोलून, उदोउदो करीत बसलो. उलट, विरोधी पक्षाने उणिवा शोधून टीका केली. आपणास साधे विरोधी पक्षनेतेपदही मिळू शकले नाही, याचे आत्मचिंतन व्हायला हवे.’’
पानसरे म्हणाले, ‘‘आपापसांतील भांडणामुळे एकमेकांच्या चुका काढण्याच्या वृत्तीमुळे पक्षाला मोठा फटका बसला आहे.’’
या वेळी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मनसे, बहुजन समाज पक्ष अशा विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच, शहरातील ज्येष्ठ नेत्यांच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.
वाघेरे यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्याच्या आयोजनाची भूमिका सांगितली. विजय लोखंडे, फजल शेख यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)