संगीत नाटकांची सूची अद्ययावत करण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:19 AM2021-02-06T04:19:57+5:302021-02-06T04:19:57+5:30
पुणे : पुस्तकातील विशिष्ट संदर्भ शोधण्यासाठी वाचक तसेच अभ्यासकांना सूचीचा खूप उपयोग होतो. सूची तयार करण्याचे काम करताना चौैफेर ...
पुणे : पुस्तकातील विशिष्ट संदर्भ शोधण्यासाठी वाचक तसेच अभ्यासकांना सूचीचा खूप उपयोग होतो. सूची तयार करण्याचे काम करताना चौैफेर वाचन, संदर्भांचा अभ्यास आणि संशोधन करावे लागते. सध्या सूचीतज्ज्ञांची आणि सूचीकारांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे सूचीसारख्या दुर्लक्षित विषयाचे महत्त्व अधोरेखित करत पुणे नगर वाचन मंदिरातर्फे होत असलेला सन्मान विशेष आहे, अशा भावना सूचीकार शिल्पा सबनीस यांनी व्यक्त केल्या. सध्या संगीत नाटकांची सूची अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
पुणे नगर वाचन मंदिराच्या १७३ व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळ्याचे ७ फेब्रुवारी रोजी आयोजन केले आहे. यामध्ये शिल्पा सबनीस यांना वाचन चळवळीतील आदर्श कार्यकर्ता पुरस्काराने गौैरवण्यात येणार आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. या वेळी अरुण जंगम यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, तर श्री गंधर्व - वेद प्रकाशनाला संत वाड्.मयविषयक ग्रंथ पुरस्कार दिला जाणार आहे. यानिमित्त शिल्पा सबनीस यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
सबनीस म्हणाल्या, ‘वैचारिक, चरित्रात्मक, ऐतिहासिक, विज्ञान, कला अशा विषयांवरील पुस्तकांच्या शेवटी त्या पुस्तकातील व्यक्तींच्या नावांची, संस्थांची, संज्ञांची, संस्थांची एका विशिष्ट पद्धतीने केलेली यादी म्हणजेच सूची. अशा सूचीवरून अभ्यासकांना आपल्या विषयावरील लेख मिळविणे सोपे जाते. सूची करण्याच्या कामात प्रचंड चिकाटी, कष्ट लागतात. संबंधित तज्ज्ञांशी चर्चा करावी लागते. मराठी सूची करताना सध्या तरी संगणकीय प्रोग्रम तयार मिळत नाही. त्यामुळे संपूर्णत: स्वतंत्रपणे काम करावे लागते.’
सबनीस यांनी २००५ साली दाते ग्रंथ सूचीतून सहायक संपादक म्हणून काम पाहायला सुरुवात केली. त्यादरम्यान डॉ. सदानंद मोरे यांच्या ‘लोकमान्य ते महात्मा’ या राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित ग्रंथाच्या सूचीचे काम केले. संगीत नाटकाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘जन्मदा’ संस्थेने प्रकाशित केलेल्या अंकासाठी सूची तयार केली. ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ या ग्रंथाच्या सूचीचे रा. ग. जाधव यांच्यासह काम करतानाचा अनुभव समृध्द करणारा होता, असेही त्या म्हणाल्या.