दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 01:09 AM2018-08-27T01:09:41+5:302018-08-27T01:10:12+5:30
मध्य रेल्वेची अप लाईन मध्यरात्री सुरू : मिडल लाइन दिवसभर बंद
लोणावळा : पुणे-मुंबई लोहमार्गावर शनिवारी रात्री १०.५० वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाटात अप व मिडल लाइनवर दरड कोसळली. रेल्वे वाहतूक मध्यरात्रीपर्यंत ठप्प होती. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अप लाइनवरील दगड बाजूला करत मुंबई व पुणे या दुतर्फा जाणारी वाहतूक धिम्म्या गतीने सुरू करण्यात आली. दरम्यान, मिडल लाइन ही शनिवारी रात्रभर व रविवारी दिवसभर बंद ठेवत डोंगरावरील सैल झालेले दगड काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले होते.
लोणावळा व खंडाळा परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर असल्याने डोंगरभागातील सैल झालेले दगड शुक्रवारी व शनिवारी लोहमार्गावर पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यामध्ये जीवित वा वित्तहानी झाली नाही.
शनिवारी रात्री अप व मिडल या दोन्ही लाइनवर मोठमोठे दगड व माती डोंगरावरून खाली आल्याने मुंबई व पुणे या दोन्ही बाजूंकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. यामुळे कोल्हापूर-अहमदाबाद ही रेल्वे खंडाळा स्थानकावर, तर सिद्धेश्वर एक्सप्रेस ही गाडी सीएसटी स्थानकावर थांबविण्यात आली होती. लोणावळा व कल्याण येथील आपत्कालीन पथकाने रात्री तातडीने अप लाइनवरील दगड बाजूला करीत मध्यरात्री साडेबाराला ही लाइन सुरु केली. तद्नंतर रेल्वे वाहतूक काही मिनिटे उशिराने सुरु झाली. दिवसभर या भागात धिम्म्या गतीने रेल्वे वाहतूक सुरु होती. रात्री हवा, पाऊस व अंधारामुळे कामात अडथळा येत होता.
दिवस उजाडल्यानंतर खंडाळा घाटातील दरडप्रवण भागाची पाहणी करत डोंगरातील सैल झालेले दगड, तसेच मोठे दगड फोडून बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते, याकरिता मिडल लाइन दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. मागील वर्षीदेखील मंकी हिल भागात दरड पडल्याच्या घटना घडल्या होत्या. खंडाळा घाटात लोहमार्गावर वारंवार दरड पडण्याच्या घटना घडू लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे प्रशासनाने या घटना रोखण्याकरिता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत.