आजपासून जिल्हा न्यायालयातील कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:15 AM2021-09-07T04:15:53+5:302021-09-07T04:15:53+5:30
पुणे : कोरोना रुग्णसंख्या घटल्यानंतर पुणे जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले. तरीही जिल्हा न्यायालयातील कामकाज एकाच शिफ्टमध्ये ...
पुणे : कोरोना रुग्णसंख्या घटल्यानंतर पुणे जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले. तरीही जिल्हा न्यायालयातील कामकाज एकाच शिफ्टमध्ये सुरू होते. मात्र, मंगळवार (दि. ७)पासून जिल्हा न्यायालयातील कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू होत आहे. जिल्हा न्यायालयातील कॅन्टीन, बार रूम सुरू करण्यात येणार आहेत. न्यायालयातील कामकाज पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू होत असल्याने न्यायालयीन कामकाजाला गती मिळणार आहे. याबाबत उच्च न्यायालयाने पुणे येथील सर्व न्यायालयांसाठी परिपत्रक जारी केले असून, १०० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत न्यायालये सुरू करण्याबाबत आदेश देण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी मार्च महिन्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे न्यायालयातील कामकाज एका शिफ्टमध्ये सुरू होते. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर न्यायालयातील कामकाज पुन्हा एकदा दोन शिफ्टमध्ये सुरू केले होते. मात्र, एप्रिल २०२१ मध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात परत एकदा लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून न्यायालयातील कामकाज एकाच शिफ्टमध्ये सुरू होती.
---------------------------------
जिल्हा न्यायालयातील कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू झाले असले तरी न्यायालयात येताना मास्क परिधान करणे, न्यायालयीन कक्षात गर्दी न करणे, यांसह अन्य नियमांचे पालन करायचे आहे. पुणे जिल्हा न्यायालयातील ९७ टक्के वकिलांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ५८ टक्के वकिलांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित ३८ ते ३९ टक्के वकिलांचा कोरोना लसीचा पहिला डोस झाला आहे.
- ॲड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन