नळ स्टॉप चौकातील दुहेरी उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:09 AM2021-06-01T04:09:22+5:302021-06-01T04:09:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नळ स्टॉप चौकातील पुण्यामधल्या पहिल्या दुहेरी उड्डाणपुलाच्या कामाला अखेर सुरुवात झाली. मेट्रोच्या खांबांना धरून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नळ स्टॉप चौकातील पुण्यामधल्या पहिल्या दुहेरी उड्डाणपुलाच्या कामाला अखेर सुरुवात झाली. मेट्रोच्या खांबांना धरून बांधण्यात येत असलेल्या या पुलाचे काम येत्या ऑक्टोबर अखेरीस पूर्ण होईल, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
सुमारे ७०० मीटर लांबीचा हा पूल आहे. कर्वे रस्त्याच्या मध्य भागात असलेल्या मेट्रोच्या खांबांना जोडून हा पूल असेल. रस्त्यापासून तो ८ मीटर उंचीवर आहे. खांबाच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी साडेसात मीटर अशी त्याची १५ मीटरची रुंदी आहे. त्यावर वाहनांसाठी दोन्ही बाजूंना प्रत्येकी २ अशा ४ लेन असतील. रस्ता, त्यावर हा पूल व त्यावर मेट्रो मार्ग अशी ही रचना आहे.
नळ स्टॉप चौकातली वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी या पुलाचा मोठा उपयोग होणार आहे. नळ स्टॉप चौकात जाण्याची गरज नसलेली सर्व वाहने आता थेट या पुलावरूनच ये-जा करू शकतील. पुलासाठीचा सर्व खर्च महापालिकेने केला आहे, तर बांधकाम महामेट्रो करून देत आहे. महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले की, कोरोना टाळेबंदी, निर्बंध, कामगार परगावी जाणे आदी कारणांमुळे पुलाचे काम रखडले होते. आता ते सुरू झाले आहे. सध्याच्या रस्त्याचे दोन लेनमध्ये विभाजन करून वाहतूक प्रवाही ठेवली जात आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण होईल.