‘परिवर्तन जळगाव’मधून रंगभूमीला आवाज देण्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:19 AM2021-02-06T04:19:28+5:302021-02-06T04:19:28+5:30
उल्हास पवार : परिवर्तन कला महोत्सवास प्रारंभ पुणे : मराठी प्रायोगिक रंगभूमी व चळवळी लोप होण्याच्या काळात जळगावसारख्या छोट्याशा ...
उल्हास पवार : परिवर्तन कला महोत्सवास प्रारंभ
पुणे : मराठी प्रायोगिक रंगभूमी व चळवळी लोप होण्याच्या काळात जळगावसारख्या छोट्याशा शहरातून प्रायोगिक रंगभूमीला महाराष्ट्रभर आवाज देण्याचे काम ''परिवर्तन जळगाव'' करीत आहे, हे अभिनंदनीय व अनुकरणीय असल्याचे मत कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी व्यक्त केले.
नाटक, साहित्य, संगीत, नृत्य क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या ''परिवर्तन जळगाव'' या संस्थेतर्फे ५, ६ व ७ फेब्रुवारी या कालावधीत शुक्रवार पेठेतील ज्योत्स्ना भोळे सभागृहात "परिवर्तन कला महोत्सवा"चे आयोजन नाटकघर पुणे व अतुल पेठे यांच्या वतीने करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, लेखक सुधीर भोंगळे, आशुतोष पोतदार, शुभांगी दामले, आयोजक अतुल पेठे व परिवर्तनच्या मंजूषा भिडे उपस्थित होत्या.
परिवर्तन कला महोत्सवाची सुरुवात ''अमृता साहिर इमरोज'' या शंभू पाटील लिखित व मंजूषा भिडे दिग्दर्शित नाटकाने झाली. अमृता प्रितम यांच्या जीवनावर आधारित हे नाटक वास्तव व आभासी जग यांचं दर्शन आज रसिकांना झाले. प्रायोगिक रंगभूमीवरील अनेक शक्यता या नाटकाच्या माध्यमातून रसिकांना जाणवल्या व या नाटकाचा इतिहास व समकालीन जीवन याची सांगड घालून केलेला हा प्रयोग एक समृद्ध करणारा अनुभव होता. यात शंभू पाटील व हर्षदा कोल्हटकर यांनी भूमिका साकारल्या.
यानंतर साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी श्रीकांत देशमुख यांच्या व्यक्तिचित्रणावर आधारित व शंभू पाटील नाट्य रूपांतरित "नली" हे एकलनाट्य सादर करण्यात आले. योगेश पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाने शेती, ग्रामीण भागातील लोकजीवन, शिक्षण यासोबतच मातीशी निगडित प्रश्नांची अनोखी मांडणी या नाटकात करण्यात आली. या एकलनाट्याचा ४७ वा प्रयोग महोत्सवात हर्षल पाटील यांनी सादर केला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ६ फेब्रुवारी रोजी महाश्वेता देवी यांना समर्पित ''कुरुक्षेत्रानंतर'' हा नाट्यप्रयोग सादर होईल. महोत्सवाचा समारोप ७ फेब्रुवारी रोजी ''हंस अकेला'' या सांगीतिक कार्यक्रमाने होईल. संत कबिरांच्या साहित्याचा व जीवनप्रवासाचा परिवर्तनने सांगीतिक शोध घेतला आहे.