शाळांकडून मुलांसाठीही 'वर्क फ्रॉम होम'ची धमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 01:31 PM2020-03-27T13:31:16+5:302020-03-27T13:31:58+5:30

लाॅकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने आता शाळांनी मुलांना विविध ऑनलाईन टास्क देण्यास सुरवात केली आहे.

Work from home for school children too rsg | शाळांकडून मुलांसाठीही 'वर्क फ्रॉम होम'ची धमाल

शाळांकडून मुलांसाठीही 'वर्क फ्रॉम होम'ची धमाल

Next

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : एकीकडे आई-बाबा घरीच असल्याचा आनंद, तर दुसरीकडे बाहेर खेळायला जायला परवानगी नाही... आई-बाबांचे 'वर्क फ्रॉम होम' सुरू असल्याने ते घरी असूनही कामातच व्यस्त! मग मुलांनी दिवसभर करायचे तरी काय? मुलांचा दिवसभरातील वेळ मजेत जावा, यासाठी शाळांनीही आता मुलांसाठी 'वर्क फ्रॉक होम' ची धमाल सुरू केली आहे. शिवणे येथील 'वॉलनट स्कुल' या शाळेने या उपक्रमाचा श्रीगणेशा केला आहे.

कोरोनाच्या पर्शवभूमीवर सर्वत्र 'लॉकडाऊन' असल्याने शाळा बंद आणि मुले घरीच आहेत. संसर्गाचा धोका लक्षात घेऊन मुलांना बाहेर खेळायला सोडणेही शक्य होत नाही. त्यामुळेच 'वॉलनट स्कुल'ने मुलांसाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ईमेलद्वारे पालकांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. इमेलमध्ये दररोज पाच 'टास्क'चा समावेश करण्यात आला आहे. मुलांच्या वयोगटानुसार यामध्ये उपक्रम समाविष्ट आहेत. दररोज हे पाच टास्क पूर्ण करून त्याचे फोटो किंवा व्हिडीओ ईमेलमध्ये दिलेल्या लिंकवर अपलोड करायचे आहेत. हा ईमेल थेट संबंधित मुलांच्या  शिक्षकांकडे जाणार आहे. एखादा उपक्रम मुलांनी कसा केला, याबाबत शिक्षक प्रतिक्रिया देणार आहेत, सुधारणा कळवत आहेत. त्यामुळे मुलांना हे टास्क करताना खूप आनंद मिळत असल्याचे पालकांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.

पहिल्या दोन टास्कमध्ये लिखाण, वाचन, हस्ताक्षर, इंग्रजीतून संवाद यावर भर देण्यात आला आहे. एक टास्क चित्रकला, हस्तकला, तर एक टास्क व्यायामावर अवलंबून आहे. एखादी वस्तू बनवताना, पत्त्यांचा बंगला बनवताना, चित्र काढताना, आईला घरकामात मदत करताना किंवा सूर्यनमस्कार करताना, व्हिडीओ काढून गुगल लिंकवर अपलोड करायचा आहे. नेहमी अभ्यासात, पुस्तकात अडकलेल्या मुलांना अशा अक्टिव्हिटी करताना खूप मजा येत आहे.

'लोकमत'शी बोलताना वॉलनट स्कुलच्या संचालिका अर्पिता करकरे म्हणाल्या, 'आता पालक आणि मुले दोघेही घरीच आहेत. मुलांना काय खेळायला द्यायचे, काय शिकवायचे याबाबत पालक गोंधळलेले आहेत. दर वर्षी शाळेमध्ये परीक्षा संपल्या की शेवटचे दोन आठवडे अभ्यासेतर उपक्रमांचा समावेश असलेला 'मस्ती की पाठशाला' हा उपक्रम घेतला जातो. यंदा कोरोनामुळे शाळा लवकर बंद झाल्या आहेत. त्यामुळे शाळेकडून इमेलच्या माध्यमातून मुलांना टास्क द्यायला सुरुवात केली आहे. हा उपक्रम ज्युनियर केजी ते पाचवीच्या मुलांसाठी आहे. घरात असलेल्या वस्तू वापरून मुलांना कल्पनाशक्तीचा वापर करून काही वस्तू बनवायच्या आहेत, चित्रे काढायची आहेत, छोटेसे घरकाम करायचे आहे, झाडांना पाणी घालायचे आहे, एखादा खेळ खेळायचा आहे. मुलांच्या वयोगटानुसार उपक्रम ठरवण्यात आले आहेत. पालकांनी या कृतींचे फोटो किंवा व्हिडीओ शिक्षकांना पाठवायचे आहेत. उपक्रम कसे वाटले, कोणाचे खूप छान झाले, कोणाला सुधारणा करण्याची गरज आहे, याबाबत शिक्षक प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांशी वैयक्तिक संवाद साधणार आहेत.'

पालक रुपाली कागले म्हणाल्या, 'शाळा लवकर संपल्यामुळे मुले आता घरी आहेत. कोरोनाचे थैमान पाहता मुलांना घराबाहेर सोडता येत नाही. मुले टीव्ही किंलवा मोबाईलसाठी हट्ट धरतात. मात्र, शाळेने असाईनमेंटची चांगली संकल्पना पालक आणि मुलांसाठी सुरू केली आहे. मुले हे उपक्रम एन्जॉय करत आहेत आणि त्यांचा वेळही चांगला जात आहे. शाळेचा हा प्रयोग खूपच आवडतो आहे.'
 

Web Title: Work from home for school children too rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.