‘आयएसओ’ देणाऱ्या कंपनीचे काम संशयास्पद
By admin | Published: March 12, 2016 01:14 AM2016-03-12T01:14:34+5:302016-03-12T01:14:34+5:30
पंचायत समितीने ‘ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत यांना ‘आयएसओ’ प्रमाणपत्र देण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीचे काम संशयास्पद असून
शिरूर : पंचायत समितीने ‘ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत यांना ‘आयएसओ’ प्रमाणपत्र देण्यासाठी नियुक्त
केलेल्या कंपनीचे काम संशयास्पद असून, खिरापतीप्रमाणे प्रमाणपत्रवाटपाच्या या प्रकरणाची चौकशी व्हावीस अशी मागणी विविध पक्ष-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
निकषात बसत नसताना तसेच शाळांची तपासणी न करता ‘क्वालिटी असेसर्स’ या कंपनीने आयएसओ प्रमाणपत्र बहाल केले होते.
याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर पंचायत समितीने प्रमाणपत्रवाटप बंद केले होते.
अशा बोगस पद्धतीने प्रमाणपत्रवाटप केल्यामुळे ‘क्वालिटी अॅसेसर्स’वर कारवाईची मागणी करण्यात आली होती.
पंचायत समितीने याकडे दुर्लक्ष केले व ७ ते ८ महिने प्रमाणपत्रवाटप बंद ठेवले. त्यानंतर पुन्हा त्याच कंपनीला उर्वरित शाळा, ग्रामपंचायतींना प्रमाणपत्रवाटपाचे काम सुरू करण्याची मुभा दिली. याबाबत आज ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
जनता दलाचे युवक प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे म्हणाले, ‘‘आयएसओ मानांकन मिळणे म्हणजे त्या संस्थेचे शाळेचे काम त्या योग्यतेचे हवे. या मानांकनासाठी विविध प्रकारचे निकष आहेत. या निकषांत बसत असेल, तरच त्या संस्था-शाळांना प्रमाणपत्र दिले जाते; अन्यथा त्या मानांकनाचे महत्त्वच राहत नाही.
ढोक सांगवीचा प्रकार ‘लोकमत’मधील वृत्तामुळेच समजला. कंपनी अशा प्रकारे प्रमाणपत्रवाटप करीत असल्यास त्याची चौकशी होणे अपेक्षितच आहे.’’ जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर यांनीही अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली.
(वार्ताहर)