कोरोना काळातील पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:09 AM2021-01-10T04:09:37+5:302021-01-10T04:09:37+5:30
तळेगाव ढमढेरे: कोरोना काळामध्ये समाजातील इतर घटकांवर बरोबरच पत्रकारांनी देखील जीव धोक्यात घालून काम केलेले असून पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद ...
तळेगाव ढमढेरे: कोरोना काळामध्ये समाजातील इतर घटकांवर बरोबरच पत्रकारांनी देखील जीव धोक्यात घालून काम केलेले असून पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले आहे.
शिक्रापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलच्यावतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारांचा कोरोना योद्धा पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आमदार पवार बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. पवन सोनवणे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवदीप उंदरे, शिक्रापूरचे माजी सरपंच आबासाहेब करंजे, बापूसाहेब जकाते, व्यंकटेश कृपा कारखान्याचे संचालक अरुण करंजे, घोडगंगा कारखान्याचे संचालक शिवाजी वडघुले,विलास तापकीर,बाबासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.
पत्रकरांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलच्या वतीने होत असलेला सन्मान सोहळा ही देखील कौतुकाची बाब असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले, तर पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकारांनी देखील कोरोना संक्रमण काळामध्ये जीव धोक्यात घालून काम केलेले असल्याने त्यांचा गौरव होणे गरजेचे असल्याचे सांगत राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने समाजातील विविध घटकांच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जाणार असल्याचे डॉ.पवन सोनवणे यांनी सांगितले. सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे जिल्हा सरचिटणीस डॉ. अजिंक्य तापकीर यांनी केले तर आभार प्रदेश सरचिटणीस डॉ. पवन सोनवणे यांनी मानले.
०९ तळेगाव ढमढेरे पुरस्कार
पत्रकार दिनानिमित्त सुनील भांडवलकर यांना सन्मानित करताना आमदार अशोक पवार व इतर.