पाच-सहावेळा मुदतवाढ मिळूनही कर्वेनगर उड्डाणपुलाचे काम अपूर्णच; वाहतुकीचा खोळंबा नित्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:27 PM2017-11-15T12:27:53+5:302017-11-15T12:33:51+5:30
कर्वेनगरमधील चौकात संथगतीने सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. उड्डाणपुलाला सुरुवात होऊन तब्बल सहा वर्षे लोटली आहेत. त्यामुळे काम पूर्ण कधी होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
कर्वेनगर : कर्वेनगरमधील चौकात संथगतीने सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. बांधकाम असेच संथ पद्धतीने चालू राहिल्यास पूर्ण कधी होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
उड्डाणपुलाला सुरुवात होऊन तब्बल सहा वर्षे लोटली आहेत. आॅक्टोबर २०१५ पर्यंत त्याला मुदतवाढ करण्यात आली होती. त्यावेळीही मुदतवाढ मिळूनही हे काम आता तरी पूर्ण होणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला होता.
कर्वेनगर चौकात वारजे आणि डेक्कनकडून येणार्या रस्त्याबरोबर कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेजकडून येणारा रस्ता व राजाराम पुलाकडून विकास मित्र मंडळ चौकात येणारा असे एकूण चार रस्ते एकत्रित येतात. परंतु, हे रस्ते ठराविक अंतर ठेऊन एकत्र येतात. त्यामुळे चौकात होणार्या वाहतूककोंडीमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेअतंर्गत हे काम हाती घेण्यात आले आहे.
कर्वेनगर आणि वारजे अशा दोन टप्प्यात हे काम हाती घेण्यात आले होते. प्रथम भैरवनाथ मंदिर ते काकडे सिटी हा टप्पा असा ५०० मीटरचा टप्पा सुरू करण्यात आला.
पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे अधिकारी सांगत आहेत, पण अशी किती वेळा अंतिम टप्प्याची वचने पालिका अधिकारी देणार, असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष विनोद मोहिते यांनी विचारला.
कर्वेनगरचा पूल जेथे संपतो तेथेच पुढचे ८० मीटर अंतर सोडून सुमारे ७०० मीटर लांबीच्या या पुलाचे काम सुरू होणार असल्याचे नगरसेविका लक्ष्मी दुधाणे यांनी सांगितले.
या दोन्ही पुलांचे काम एकाच वेळी सुरू करतील, असे नागरिकांना वाटत होते. परंतु, आंबेडकर चौकाच्या उजव्या बाजुला असलेल्या रस्त्या जवळील जागा ताब्यात घेण्यात आल्या नाहीत. विशेष भूसंपादन अधिकारी क्र.१६ यांची जागा ताब्यात घेण्याचा प्रक्रिया सुरू आहे. कर्वेनगरमधील पुलाचे काम संपत आले असून अजुनही जागा ताब्यात घेतल्या किंवा नाही, हे पालिका अधिकारी सांगत नाहीत. दोन्ही पुलांची लांबी १२०० मीटर असून त्यासाठी खर्च व दंडासह रक्कम कोणालाही सांगता आली नाही.
कर्वेनगरमधील उड्डाणपुलाची वर्क आॅर्डर निघाल्यानंतर पाच महिन्यात काम सुरू झाले. मार्किंग फायनल नव्हते, तांत्रिक अडचणीमुळे दिवस वाया गेले. डिसेंबर २०१७ पहिल्या आठवड्यात हा पूल पूर्ण होईल.
- राजेश बराटे, नगरसेवक