कोरेगाव भीमा आयोगाचे काम महिना अखेरीस सुरु होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 09:12 PM2018-08-20T21:12:59+5:302018-08-20T21:13:36+5:30
चौकशी आयोगाकडे हिंसाचार प्रकरणी सर्वसामान्य नागरिक, पोलीस आणि प्रशासन यांच्या माध्यमातून ३४१ अर्ज प्राप्त झाले आहेत.
पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी राज्य शासनातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगाचे कामकाज येत्या २८ आॅगस्टपासून पुण्यात सुरू होणार आहे. जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये आयोगाचे कार्यालय स्थापन करण्यात आले असून आयोगाकडे आलेल्या अर्जांपैकी सुमारे पाचशे अर्जांवर सुनावणी घेण्यात येणार आहे.
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचारच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. एन. पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमीत मलिक यांचा द्विसदस्यीय आयोग स्थापन करण्यात आली. या आयोगाने कोरेगाव भीमा, पेरणेफाटा, वढू-बुद्रुक, सणसवाडी येथे भेट देवून स्थानिकांशी संवाद साधला आहे. तसेच चौकशी आयोगाकडे हिंसाचार प्रकरणी सर्वसामान्य नागरिक, पोलीस आणि प्रशासन यांच्या माध्यमातून ३४१ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जांची पडताळणी केल्यानंतर १० आॅक्टोबरपर्यंत चौकशी आयोगाकडून सुनावणी, साक्ष नोंदविणे आदी तपासणीची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.