पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीचे काम काही अटीवर होणार सुरू : जिल्हाधिकारी नवल किशोर राम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 05:11 PM2020-04-14T17:11:20+5:302020-04-14T17:11:31+5:30
औद्योगिक क्षेत्राकरीता पासेसची सुविधा उपलब्ध
पुणे : शासनाच्या आदेशानुसार औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्या काही अटींवर सुरू करण्यास परवानगी दिल्या आहेत.यामुळे लॉकडाऊनमुळे गेल्या 23 दिवसांपासून बंद आसलेले औद्योगिक क्षेत्र काही प्रमाणात सुरू होण्यास मदत होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक असलेल्या परवानग्या व पासेस देण्याची सोयी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
पुणे, मुंबईसह संपूर्ण देशातच कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्रांतील कंपन्या, आयटी व अन्य कंपन्या पूर्णपणे बंद आहेत. परंतु राज्य शासनाने काही अटी व शर्तीवर बंद असलेले औद्योगिक क्षेत्र काही प्रमाणात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगीक औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक त्या परवानग्या व पासेस उपलब्ध करुन देण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत.
पुणे जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक त्या परवानग्या व पासेस देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये पोट कलमानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष राम यांनी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, समन्वय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल मो. क्र. ७०२८४२५२५६, उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख मो. क्र. ९५९४६१२४४४ यांच्याकडे औद्योगीक क्षेत्रातील विविध कंपन्यांना शासनाने दिलेले निर्देश/ मार्गदर्शक सुचनेप्रमाणे कंपनी सुरु ठेवण्यासाठी परवानग्या देणे, कंपन्यांमध्ये आवश्यक ते लागणारे मनुष्यबळ, तसेच त्यांचे वाहन यांचे पासेस देणे, कोरोना विषाणू विषयाच्या अनुषंगाने औद्योगिक क्षेत्राशी निगडीत पत्रव्यवहार करणे ह्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत, असेही जिल्हाधिकारी राम यांनी कळविले आहे.