अनोळखी महिलेचे जिल्हाधिकारी कार्यालयात महिनाभर काम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 01:50 AM2019-01-21T01:50:17+5:302019-01-21T01:50:56+5:30
एकाच्या ओळखीतून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारी नोकरी लावतो, यावर विश्वास ठेवला़
पुणे : एकाच्या ओळखीतून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारी नोकरी लावतो, यावर विश्वास ठेवला़ महिला व तिच्या दिराच्या नोकरीसाठी त्यांनी २ लाख ७० हजार रुपये दिले़ त्यानंतर या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये महिनाभर आवक, जावक इतर किरकोळ स्वरूपाची कामे केली़ त्यानंतर पगाराविषयी विचारणा केल्यावर उपजिल्हाधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले़ आपण तुम्हाला ओळखतच नाही़ पैसे देऊन नोकरी लागते, असा प्रकार होत नसल्याचे सांगितले़
या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी श्रीकांत पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ पवार हा देव मामलेदार संस्थेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डेटा एंट्री आॅपरेटर असल्याचे या महिलेला समजले़ याप्रकरणी वडगाव बुद्रुक येथील एका ३३ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे़
याबाबत पोलिसांनी सांगितले की, या महिलेचे पती उदरनिर्वाहासाठी मिळेल त्या ठिकाणी पूजापाठ करण्याचा व्यवसाय करतात़ कात्रज येथील खंडोबा मंदिरात त्यांच्या दिराची ५ ते ६ महिन्यांपूर्वी श्रीकांत पवार याची भेट झाली़ त्याने जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई म्हणून नोकरी लावतो, असे सांगून त्यासाठी दीड लाख रुपये लागतील, असे सांगितले़ या महिलेलाही त्याने नोकरीचे आश्वासन दिले़ त्यानुसार त्यांनी नातेवाईकांकडून व पतसंस्थेतून कर्ज काढून पवार याला २ लाख ७० हजार रुपये दिले़ १३ नोव्हेंबर २०१८ रोजी पवार याने या महिलेला जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये पवार भेटले़ त्याच्या सांगण्यावरून त्या साधारण महिनाभर आवक-जावक, इतर किरकोळ स्वरूपाची अर्ज टाईप करणे, शिक्के मारणे यासारखी कामे केली़ ही कामे करताना त्यांची कार्यालयातील महिला व इतरांशी ओळख झाली़ पगाराचे काम पाहणारे चव्हाण यांच्याशी ओळख झाली़ तेव्हा त्यांनी पैसे देऊन नोकरी लागते का, याबाबत विचारणा केली़ त्यांनी असा काही प्रकार होत नाही, असे सांगितले़ त्यांना कामावर येऊन एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाला असताना पगार न झाल्याने त्यांनी उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांची त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन भेट घेऊन पगाराची विचारणा केल्यावर त्यांनी या महिलेला ओळखत नसल्याचे सांगितले व पैसे देऊन नोकरी लागते असा प्रकार होत नसल्याचे सांगितले़ त्यानंतर मोनिका सिंग यांच्या सांगण्यावरून त्यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़
>सरकारी कार्यालयात कोणीही काम करू शकते?
या सर्व प्रकारामुळे पोलीस चक्रावून गेले असून जिल्हाधिकारी कार्यालयात एखाद्या डेटा एंट्री आॅपरेटरच्या सांगण्यावरून एखादी महिला निवडणूक शाखेत येणारा व जाणारा सर्व पत्रव्यवहार पाहते़ त्याची नोंद करते़ इतरही काम महिनाभर करते़ तरीही तिची कोणतीही चौकशी होत नाही़ महिन्याभरानंतर उपजिल्हाधिकाºयांना समजते की ही महिला आपल्याकडे काम करत आहे.