भोरच्या नवीन व्यापारी संकुलाच्या कामास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:10 AM2021-05-06T04:10:01+5:302021-05-06T04:10:01+5:30
भोर: येथील बसस्थानकात असणारे धोकादायक व्यापारी संकूल पाडून त्या ठिकाणी नवीन व्यापारी संकूल बांधण्यासाठी सुमारे १० कोटींचा निधी मंजूर ...
भोर: येथील बसस्थानकात असणारे धोकादायक व्यापारी संकूल पाडून त्या ठिकाणी नवीन व्यापारी संकूल बांधण्यासाठी सुमारे १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील साडेचार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार मंगळवारपासून पालिकेने जुने संकूल पाडण्यास सुरुवात केली आहे.
भोर बसस्थानकातील व्यापारी संकूल धोकादायक झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रानुसार नगरपालिकेने सहा महिन्यांपूर्वीच सर्व गाळेधारकांना इमारत खाली करण्यास सांगितले होते. मात्र, इमारत खाली करण्यात आली नव्हती. त्यामुळे भोर नगरपालिका प्रशासनाने मंगळवारपासून पोलीस बंदोबस्तात, नगरपालिका कर्मचारी यांच्या मदतीने ४ जेसीबी लावून सदरचे धोकादायक व्यापारी संकूल पाडायला सुरुवात केली आहे. सदर ठिकाणी नवीन व्यापारी संकूल बांधकाम करण्यात येणार आहे.
नवीन व्यापारी संकुलासाठी आमदार संग्राम थोपटे यांच्या विशेष प्रयत्नाने वैशिष्ट्यपूर्ण आणि नगरोत्थान योजनेतून सुमारे १० कोटी रु. काम असून पहिल्या दोन टप्प्यांसाठी साडेचार कोटी मंजूर झाले आहेत.
या नवीन संकुलात ६० हजार स्क्वेअर फुटांचे बांधकाम असून १६ हजार स्क्वेअर फुटांचे पार्किग आहे. त्यात ८१ गाळे असून सांस्कृतिक हॉल, तसेच महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात होईल, असे नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी सांगितले.
भोर नगरपालिकेने १९८३-८४ साली भोर बसस्थानकात नगरपालिका हद्दीत २४ गाळे असलेले व्यापारी संकुल उभारले होते. त्या वेळी १० हजार अनामत रक्कम ५ हजार नावनोंदणी आणि पाच हजार ७०० वार्षिक भाडे तत्त्वावर गाळेधारकांना गाळे देण्यात आले होते. भोर नगरपालिकेने ३५ वर्षांपूर्वी बांधलेले व्यापारी संकूल पाडले असून, नवीन बांधण्यात येणाऱ्या बांधकामातील गाळे मूळ २४ गाळेधारकांना प्राधान्याने द्यावेत, अशी मागणी मूळ गाळेधारक नारायण जाधव व मोहण घोणे यांनी केली आहे.
जुन्या गाळेधारकांना प्राधान्याने गाळे मिळावेत, असा ठराव नगरपालिकेने केला आहे. सदरचा ठराव शासनाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे, या व्यापारी संकुलाचे काम तीन टप्प्यात असून दोन टप्प्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून सदर कामाला सुमारे साडेचार कोटी निधी मंजूर आहेत लवकरच काम सुरू होईल.
डाॅ. विजयकुमार थोरात, मुख्याधिकारी, भोर नगरपालिका
०५ भोर
भोर बसस्थानकातील धोकादायक व्यापारी संकूल पाडण्याचे सुरू असलेले काम.