पुण्यातील कार्गो टर्मिनलचे काम पूर्णत्वाकडे; टर्मिनल मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता
By नितीश गोवंडे | Published: April 28, 2023 03:26 PM2023-04-28T15:26:48+5:302023-04-28T15:26:56+5:30
नवीन कार्गो टर्मिनलमुळे पुण्यातून देशांतर्गत मालवाहतुकीला चालणार मिळणार
पुणे: आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने उभारण्यात येत असलेल्या कार्गो टर्मिनलचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. हे टर्मिनल मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या नवीन कार्गो टर्मिनलमुळे पुण्यातून देशांतर्गत मालवाहतुकीला चालणार मिळणार आहे.
पुणेविमानतळावरून दिवसाला १८० ते १९० विमाने उड्डाण घेतात. त्याद्वारे दिवसाला २६ ते २८ हजार प्रवासी प्रवास करतात. तसेच, दिवसाला १२० टन कार्गो वाहतूक होते. भारतीय विमानतळ प्राधिकरणाला कार्गो टर्मिनलसाठी हवाई दलाने जागा दिली आहे. कार्गो टर्मिनलची शेवटच्या टप्प्यातील काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. ती वेगाने सुरु असून, ही कामे झाल्यानंतर टर्मिनलची तपासणी बीसीएएस यांच्याकडून केली जाणार आहे. त्यांनी तपासणी करून कार्गो टर्मिनल सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर पुण्यातून देशांतर्गत मालवाहतुकीला सुरूवात केली जाणार आहे.
दिवसाला ३६ हजार टन मालवातूक करता येणार..
पुणे विमानतळावरून सध्या कार्गो सुविधेची क्षमता २५ हजार टन आहे. पण, नवीन कार्गो टर्मिनल सुरु झाल्यानंतर दिवसाला ३६ हजार टन मालवाहतूक करणे शक्य होणार आहे. पुणे विमानतळावरून देशांतर्गत मालवाहतूक सुरू आहे. पण, अद्यापही अनेक लॉजिस्टिक कंपन्यांना त्यांचा माल मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय स्थळी पाठवावा लागतो. पुणे विमानतळावरून कार्गो सुविधेसाठी जागा वाढवल्यास आंतरराष्ट्रीय शहरांसह अनेक नवीन देशांतर्गत ठिकाणेही कार्गो सेवेत समाविष्ट होतील. त्याचा फायदा पुण्यातील औद्योगिक व कृषी क्षेत्राला होणार आहे.