लोहगाव येथील नव्या टर्मिनलचे काम ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण; वर्षाला १ कोटी २० लाख प्रवासी क्षमता असणार
By नितीश गोवंडे | Published: April 23, 2023 05:44 PM2023-04-23T17:44:59+5:302023-04-23T17:45:17+5:30
सध्या गर्दीने त्रस्त असलेल्या प्रवाशांना यामुळे येत्या काही महिन्यांमध्येच दिलासा मिळणार
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभारण्यात येत असलेल्या नवीन टर्मिनलचे काम ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुणे विमानतळाची क्षमता ही दुपटीपेक्षा जास्त होणार आहे. सध्या गर्दीने त्रस्त असलेल्या प्रवाशांना यामुळे येत्या काही महिन्यांमध्येच दिलासा मिळणार आहे.
पुणे (लोहगाव) विमानतळाचे सध्याचे टर्मिनल २२ हजार ३०० चौरस मीटर क्षेत्रावर विस्तारले आहे. या टर्मिनल इमारतीची वार्षिक ७१ लाख प्रवासी क्षमता आहे. आता नव्याने उभारण्यात येत असलेल्या टर्मिनलचे क्षेत्र ४६ हजार ४५० चौरस मीटर आहे. हे दोन्ही टर्मिनल जोडण्यात येणार आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून नवीन टर्मिनलच्या कामासाठी ४७५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. नवीन टर्मिनल ५१ हजार ५९५ चौरस मीटर क्षेत्रावर विस्तारले आहे. या टर्मिनलची वर्षाला एक कोटी २० लाख प्रवासी क्षमता असणार आहे. दोन्ही टर्मिनल जोडल्यानंतर नागरी वाहतुकीसाठी ७३ हजार ८९५ चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे. दोन्ही टर्मिनलची एकूण प्रवासी क्षमता देखील वाढून एक कोटी ९१ लाख होणार आहे. त्यामुळे विमानतळावर होणारी गर्दी नक्कीच कमी होणार आहे.
नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीत (जुन्या इमारतीसह) १० पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज, ७२ चेक-इन काउंटर आणि इन-लाइन बॅगेज हाताळणी यंत्रणा उपलब्ध असणार आहे. या नवीन टर्मिनलचे काम ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. जून अखेरपर्यंत टर्मिनलच्या इमारतीचे व इतर कामे पूर्ण होतील. इतर सर्व गोष्टींची तयारी झाल्यानंतर सप्टेंबरपर्यंत नवीन टर्मिनल नागरी वाहतुकीसाठी खुले केले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
सुविधा प्रकार - जुने टर्मिनल - नवीन टर्मिनल
१) वार्षिक प्रवासी क्षमता - ७१ लाख - एक कोटी २० लाख
२) प्रवासी बोर्डींग पूल - ०५ - ०५
३) प्रवासी लिफ्ट - ६ १५
४) एस्कलेटर - ५ ८
५) चेक इन काऊंटर - ३८ ३४
६) बॅग हँडलिंग सिस्टम - ० ०२
७) इन लाईन एक्सरे - ० ०२
८) इमिग्रेशन डेस्क - २० ०