महापालिका इमारत स्वच्छतेचे काम करण्यासाठी निम्म्या दराने दिले काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:10 AM2021-07-20T04:10:21+5:302021-07-20T04:10:21+5:30
पुणे : पुणे महापालिकेच्या जुन्या व नव्या इमारतीमधील साफसफाईचे ३ कोटी ११ लाख रुपयांचे काम, निम्म्या दराने निविदा भरणाऱ्या ...
पुणे : पुणे महापालिकेच्या जुन्या व नव्या इमारतीमधील साफसफाईचे ३ कोटी ११ लाख रुपयांचे काम, निम्म्या दराने निविदा भरणाऱ्या लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेस देण्यात आले आहे़ १ कोटी ५५ लाख रुपये दराने हे काम करण्यास त्यांनी तयारी दाखविल्याने स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी त्यांच्या निविदेस मान्यता देण्यात आली़
पुणे महापालिकेच्या जुन्या व नवीन इमारतीमधील पॅसेज, शौचालय, मुख्य सभागृह, स्थायी सभागृह, विशेष समिती सभागृह, महापौर यांचे कार्यालय व जुन्या व नवीन इमारतीच्या बाहेरील बाजूच्या साफसफाईच्या कामासाठी ही निविदा मागविण्यात आली होती़ या कामाकरिता चार ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या़ यापैकी दोन निविदा अपात्र ठरल्या, तर दोन निविदांपैकी एकाने ३६़६ टक्के कमी दराने निविदा सादर केली होती़ त्यामुळे ५० टक्के कमी दराने निविदा सादर करणाऱ्या लोकराज्य संस्थेस हे काम देण्यात आले आहे़
दरम्यान, वर्षभराच्या या कामाकरिता खर्च निश्चिती करून प्रशासनाने ३ कोटी ११ लाखांच्या प्रसिद्ध केलेल्या या निविदांमध्ये, तब्बल ५० टक्के कमी दराने निविदा भरल्यावर हा साफसफाईचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे़
--------------------------------