पालखी महामार्गाच्या कामाला वेग येणार
By admin | Published: January 8, 2017 03:20 AM2017-01-08T03:20:37+5:302017-01-08T03:20:37+5:30
आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाच्या कामाला वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हा महामार्ग, महामार्गावरून शहरालगत होणारे बाह्यवळण मार्ग, तसेच पालखी मुक्का
जेजुरी : आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाच्या कामाला वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हा महामार्ग, महामार्गावरून शहरालगत होणारे बाह्यवळण मार्ग, तसेच पालखी मुक्कामतळांची पाहणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे तांत्रिक विभागाचे सचिव डी. ओ. तावडे यांनी शनिवारी केली. पाहणीबाबत त्यांनी कोणतीही माहिती देण्यास मात्र नकार दिला असला तरीही येत्या १० तारखेला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हेच अधिकृत माहिती देणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शनिवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सडक परिवहन आणि राज्यमार्ग मंडळाचे सचिव डी. ओ. तावडे यांनी हडपसरपासून वाल्हेपर्यंतच्या महामार्गाची पाहणी केली. त्यांच्यासमवेत या विभागाचे कार्यकारी अभियंता सुहास चिटणीस, शाखा अभियंता डी. वाय. हुंडेकरी, पुरंदर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपभियंता डी. के. इंगळे, पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण आदी प्रशासकीय अधिकारी होते.
तावडे यांनी सासवड, वाल्हे येथील पालखीतळाची पाहणी केल्यानंतर जेजुरी येथील नियोजित पालखीतळाचीही पाहणी केली. यात केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार या मार्गाची पाहणी करीत आहोत. या महामार्गावरून आळंदी ते पंढरपूर माऊलींचे वारकरी जात असतात. त्यांच्यासाठी त्यांना हा महामार्ग जागतिक दर्जाचा व हरित महामार्ग (ग्रीन कॉरिडॉर) बनवायचा आहे. यात महामार्गाची आजची परिस्थिती, मार्गावरील बाह्यवळण रस्ते, आदींबाबतची स्थानिक अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व स्वत: पाहणी केली. जेजुरी पालखीतळाची पाहणी करताना भाजपाचे कार्यकर्ते, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सचिन पेशवे, शहराध्यक्ष अशोक खोमणे, प्रसाद अत्रे, राजेंद्र शेवाळेही उपस्थित होते.
आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर हे दोन्ही पालखी मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडे नुकतेच वर्ग करण्यात आलेले आहेत. प्राधिकरणाकडून या दोन्ही मार्गांचे काम होणार आहे. त्यासाठी आपण पाहणी करण्यासाठी येथे आलेलो आहोत. यापेक्षा अधिक माहिती स्वत: मंत्रिमहोदय नितीन गडकरीच देतील.
- डी. ओ. तावडे, सचिव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तांत्रिक विभाग