काम अर्धवट सोडले म्हणून इंटिरीअर कंपनीकडून सदनिका धारकाला मिळणार दहा लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:09 AM2021-01-09T04:09:25+5:302021-01-09T04:09:25+5:30
पुणे : सदनिकेत अंतर्गत सजावटीचे काम करणा-या कंपनीने करारानुसार वेळेत काम पूर्ण न केल्याचा ठपका ठेवत जिल्हा ग्राहक तक्रार ...
पुणे : सदनिकेत अंतर्गत सजावटीचे काम करणा-या कंपनीने करारानुसार वेळेत काम पूर्ण न केल्याचा ठपका ठेवत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका इंटिरिअर कंपनीला महिन्याभरात 9 लाख 85 हजार रूपयांची रक्कम तक्रारदाराला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे.
आयोगाचे अध्यक्ष उमेश वि.जावळीकर, सदस्या क्षितीजा कुलकर्णी आणि संगीता देशमुख यांच्या समक्ष ही सुनावणी झाली. सुरेंद्र देसाई (म्हाडा संकुल, पिंपरी) यांनी 1 जुलै 2019 मध्ये कल्याणी इंटिरिअर (सिंहगड रोड,
वडगाव बुद्रुक) यांच्याविरूद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने कल्याणी इंटरिअर यांच्याबरोबरच त्यांच्या सदनिकेत आवड आणि उपयुक्ततेनुसार अंतर्गत सजावट करण्याचा करार 27 जून 2018 ला केला होता. दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये काम पूर्ण करण्याचे निश्चित झाले होते. तक्रारदाराने करारानुसार 19 जुलै 2018 ते 13 फेब्रृवारी 2019 दरम्यान 5 लाख 10 हजार रूपयांची रक्कम कंपनीच्या खात्यात जमा केली. मात्र कोणत्याही न्यायोचित कारणांशिवाय काम बंद करून तक्रारदारास काम सुरू करण्याबाबत कोणतीही सूचना देण्यात आली नाही. जवळपास तीस टक्के काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित कामाचे नियोजन आणि पूर्तता करण्यासाठी तक्रारदाराने वारंवार संपर्क साधूनही काम सुरू करण्याबाबत आणि असुविधेबाबत कोणतीच माहिती दिली नाही. त्यामुळे तक्रारदाराने 25 मे 2019 रोजी पिंपरी पोलीस ठाणे यांच्याकडे कंपनीविरूद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. कंपनीने काम अर्धवट सोडल्याने तक्रारदाराला अन्य व्यक्तीला 3 लाख रूपये देऊन अंतर्गत सजावटीचे काम पूर्ण करावे लागले. तक्रारीतील वादकथने, दस्ताऐवज, तक्रारदारांचे तक्रारीसोबत दाखल केलेले शपथपत्र आणि तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद यावरून तक्रारदाराने मागणी केल्याप्रमाणे ही रक्कम अदा करण्यास कंपनी बाध्य आहे असा आदेश आयोगाने दिला आहे. तक्रारादाराच्या वतीने अँड डॉ. श्रीराम अरविंद करंदीकर यांनी काम पाहिले.
----------------------------------------------