संरक्षक भिंतीचे काम वादामुळे ठप्प
By admin | Published: July 21, 2015 03:14 AM2015-07-21T03:14:21+5:302015-07-21T03:14:21+5:30
लक्ष्मीनगरमध्ये मोझे विद्यालयासमोर डोंगराला चिकटून असलेल्या झोपड्यांवर दरड कोसळून चार जण दगावल्याच्या घटनेला येत्या सप्टेंबरमध्ये २ वर्षे होतील
विशाल थोरात, येरवडा
लक्ष्मीनगरमध्ये मोझे विद्यालयासमोर डोंगराला चिकटून असलेल्या झोपड्यांवर दरड कोसळून चार जण दगावल्याच्या घटनेला येत्या सप्टेंबरमध्ये २ वर्षे होतील. ही जागा पालिकेच्या आपत्कालीन विभागाने धोकादायक ठरवली आहे. या ठिकाणी अद्यापही डोंगराला चिकटून घरे आहेत. दरड कोसळण्याची शक्यता गृहीत धरून पालिकेकडून संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. मात्र, स्थानिकांच्या वादामुळे संरक्षक भिंतीचे काम बंद आहे.
सप्टेंबर २०१२मध्ये रात्रीच्या वेळी घरावर दरड कोसळल्याने सुधाकर आनंदा भिल्लोरे (वय ४०), त्यांचे वडील आनंदा नामदेव भिल्लोरे व दोन मुले आकाश (वय १२) आणि पल्लवी (वय ६) यांचा यात बळी गेला.
या दुर्घटनेत या ठिकाणी असलेल्या घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता काही नागरिकांनी या ठिकाणी पक्क्या घरांचे बांधकाम केले आहे.
मात्र, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अशी कुटुंबे पत्र्याच्याच घरात राहतात. येथे पालिकेकडून डोंगराला लोखंडी जाळ्या बसवून ‘आरसीसी कॉलम’ आणि ‘बीम’वर भिंत बांधण्यात येत आहे. मात्र, या कामाची गती वाढविणे गरजेचे असून सध्या हे काम ठप्प आहे.
डोंगराच्या वरील बाजूस मुस्लिम समाजाची दफनभूमी आहे. ही भिंत आणखी बाहेर बांधावी, असे या दफनभूमीच्या समितीतील सदस्यांचे म्हणणे आहे.
मात्र, भिंत बाहेर घेतल्यास घरांची जागा कमी होत असल्याने नागरिकांचा त्याला विरोध आहे. या वादात हे काम ठप्प आहे.