पुणे रेल्वे स्थानकातील धडधड थांबणार; १२ मीटर रुंदीच्या पादचारी पुलाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:16 PM2017-11-03T13:16:16+5:302017-11-03T13:19:31+5:30
पुणे रेल्वे स्थानकावरील शंभरी ओलांडलेल्या पादचारी पुलाच्या शेजारी १२ मीटर रुंदीच्या (सुमारे ४० फूट) नवीन पुलाचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे.
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील शंभरी ओलांडलेल्या पादचारी पुलाची धडधड अखेर थांबणार आहे. रेल्वे प्रशासनाने याच पुलाच्या शेजारी १२ मीटर रुंदीच्या (सुमारे ४० फूट) नवीन पुलाचे काम हाती घेतले आहे. येत्या दहा महिन्यांत हा पूल सेवेत येणार आहे.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस मुंबई येथील रेल्वेच्या पादचारी पुलावर झालेल्या दुर्घटनेत २२ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने पुणे रेल्वे स्थानकावरील पुलांची पाहणी केली होती. त्यात गर्दीच्या वेळी रेल्वेस्थानकातून ढोले-पाटील रस्त्याच्या बाजूने बाहेर जाणारा जुना पूल थरारत असल्याचे दिसून आले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी नवीन पादचारी पुलाचा घेतलेला निर्णय दिलासादायक
आहे. रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांनी ही माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. वाणिज्य व्यवस्थापक कृष्णनाथ पाटील, वरिष्ठ मंडल अभियंता सुरेश पाखरे या वेळी उपस्थित होते.
पुणे रेल्वे स्थानकावर पादचार्यांसाठी तीन पूल आहेत. पार्सल कार्यालयाजवळचा आणि दुसरा अर्ध पूल हमाल पंचायतजवळील फलाट क्रमांक एककडे जाणारा. शंभर वर्षांपूर्वीचा मधील जुना पूल. मुख्य पूल सोडला तर इतर पुलांवर अगदी गर्दीच्या काळातदेखील हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच प्रवासी असतात. नवीन पुलामुळे नागरिकांची चांगलीच सोय होणार आहे.
पुणे स्थानकातील जुना पूल हा, ४.८८ मीटर रुंद आहे. या पुलाच्या शेजारी वीस मीटर अंतरावर नवा पादचारी पूल बांधण्यात येणार असून, त्याची रुंदी २० मीटर असेल. तसेच, हा पूल जुन्या पुलासदेखील जोडला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना ढोले-पाटील रस्त्याच्या बाजूला बाहेर पडणे शक्य होणार आहे.
पुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. येत्या ८ ते दहा महिन्यांत हा पूल सुरू होईल, असे वरिष्ठ मंडल अभियंता पाखरे यांनी सांगितले.
रेल्वे प्रशासनाची घोषणा अन् आवाहन
रेल्वे स्थानकातील अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्यात येणार असून, त्याविरोधातील कारवाईला आणखी गती देण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या कारवाईला गती मिळणार आहे. रेल्वेस्थानकांचे नाव दर्शविणारे फलक यापुढे मराठी, हिंदी आणि इंग्रजीत दिसणार आहेत. अशा चाळीस पाट्या येत्या आठवडाभरात बदलण्यात येणार आहेत. रेल्वे ट्रॅकवर कचरा आणि माती, विटा, दगडांचे तुकडे नागरिकांनी टाकू नयेत. रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी पादचारी मार्गाचा वापर करावा. अडचणीच्या प्रसंगी १८२ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.
पूल मेट्रो स्थानकालाही जोडण्याचे नियोजन
पुणे रेल्वे स्थानकात उभारण्यात येणार्या २० मीटर रुंदीच्या पादचारी पुलाला मेट्रो स्थानकाला जोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे भविष्यात मेट्रोतील अथवा रेल्वेतील प्रवासी दोन्ही सेवांचा फायदा घेऊ शकतात. शिवाजीनगर रेल्वे स्थानकातदेखील अशीच सुविधा उभारण्यात येणार आहे.