लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर काम करा : राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 08:00 AM2019-06-06T08:00:00+5:302019-06-06T08:00:05+5:30
लोकसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सभा घेऊन भाजपाला मतदान न करण्याचे आवाहन करुनही मनसेचा प्रभाव मतदारांवर पडल्याचे दिसले नाही...
पुणे : लोकसभा निवडणुकांमध्ये ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपाविरोधात रान उठवलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी विधानसभेच्या तयारीसाठी पुण्यामध्ये कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. दोन दिवस पुण्यामधील अशोक नगरमध्ये नुकत्याच मतदार संघनिहाय घेतलेल्या बैठकांमध्ये शाखाध्यक्ष व उपाध्यक्षांकडून पक्षवाढीसाठीच्या कल्पना जाणून घेत संघटना मजबूत करण्यासाठी काय करता येईल या संदर्भात चर्चा केली. साहेबांनी आमचे म्हणणे ‘शांततेत’ ऐकून घेतल्याचेही अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले. लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर काम करण्याच्या सूचनाही यावेळी ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केल्या.
लोकसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सभा घेऊन भाजपाला मतदान न करण्याचे आवाहन करुनही मनसेचा प्रभाव मतदारांवर पडल्याचे दिसले नाही. आता विधानसभा निवडणुकांच्या तयारीला मनसेने सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शेवटच्या फळीतील कार्यकर्त्यांचे नमके काय म्हणणे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन दिवस पुण्यात ठाण मांडून बसलेल्या ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला पक्षाच्या मुख्य नेत्यांसह शहर पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्येक मतदार संघाला जवळपास दीड ते दोन तासाचा वेळ देण्यात आला होता. मतदार संघांमधील शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष 15-15 जणांच्या गटाने त्यांची भेट घेत होते.
पक्षाचा गाभा कार्यकर्ता हाच असून त्याच्या पायावरच पक्ष उभा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय व्हावे, नागरिकांच्या पक्षाकडून असलेल्या अपेक्षा जाणून घ्याव्यात, त्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आवाज उठवावा अशा प्रकारच्या सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केल्या. यासोबतच पक्षांतर्गत नेमके काय सुरु आहे याचीही चाचपणी केली. पक्षाच्या अजेंड्यावर नेमके काय प्रश्न असावेत?, कार्यकर्त्यांना काम करताना नेमक्या काय अडचणी येतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीही त्यांनी शांतपणे ऐकून घेतल्या. शाखाध्यक्षांनी ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, महिला सुरक्षा, विद्यार्थी करिअर मार्गदर्शन आदी छोट्या छोट्या कार्यक्रमांमधून पक्षाला बळकटी मिळू शकेल अशाही कल्पना मांडल्या. शहरातील कोथरुड, शिवाजीनगर, पर्वती, कसबा, वडगाव शेरी, हडपसर मतदार संघांच्या पदाधिकारी आणि शहर पदाधिकाऱ्यांच्या वेगळ्या बैठका घेण्यात आल्या.
====
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या राज ठाकरे आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत आतापर्यंत तीन ते चार सविस्तर बैठका झाल्या आहेत. पक्षाचा अजेंडा आणि विधानसभेची रणनिती याविषयी या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले. मात्र, नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये विधानसभेसंदर्भात चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले.