पुणे मेट्रोचे कामाला परवानगी मिळाली पण समोर अडचणी अनंत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 05:49 PM2020-04-24T17:49:07+5:302020-04-24T18:00:36+5:30
मागील महिनाभर मेट्रोचे सगळेच काम थांबले आहे.
राजू इनामदार
पुणे: महामेट्रो कंपनीचे पुणेमेट्रो चे कोरोना लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले काम येत्या दिवसात सुरू होईल. स्थानिक अधिकायार्ची त्यासाठी परवानगी घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. परवानगी मिळाली असली तरी त्यासाठी लागू करण्यात आलेल्या अटींमुळे कामाच्या गतीवर त्याचा परिणाम होईल असे महामेट्रोतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे पुणे मेट्रो धावायला आता बराच विलंब होण्याची चिन्हे आहेत.
मागील महिनाभर मेट्रोचे सगळेच काम थांबले आहे. तब्बल २ हजार मजूरांचा बोजा महामेट्रो सहन करत आहे. वनाज ते रामवाडी तसेच पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट अशा ३१ किलोमीटरच्या दोन मार्गांचे काम ४ ठिकाणी व एक ५ किलोमीटर अंतराचा भुयारी मार्ग अशा ५ टप्प्यांवर गेली दोन वर्ष सुरू आहे. साधारण २ हजार मजूर यावर काम करत होते. कोरोना लॉकडाऊन सुरू झाला व हे सगळेच काम बंद पडले.
आता केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन काही गोष्टींबाबत शिथील करण्याचा निर्णय घेतला असून त्यात मेट्रोच्या कामाचा समावेश आहे.
काम सुरू करण्याला परवानगी असली तरी त्यासाठी सरकारने अनेक अटीही घातल्या आहेत. त्यात प्रामुख्याने सोशल डिस्टन्सिंग, कर्मचार्यांची निवास व्यवस्था, त्यांच्या वाहतूकीला मनाई या व अन्य काही अटी़चा समावेश आहे. त्याचे पालन करून काम कसे सुरू करता येईल यावर महामेट्रो व्यवस्थापन वरिष्ठ स्तरावर चर्चा करत आहे. एखादे काम अशा प्रकारच्या अटी पाळून करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने कामाची गती, जास्त मनुष्यबळ लावता न येणे अशा काही गोष्टींवर परिणाम होईल असे वरिष्ठ अधिकार्यांचे मत आहे
सोशल डिस्टन्सिंग पाळून काम सुरू करायचे तरी कसे असा मोठा प्रश्न महामेट्रोपुढे आहे. त्यातही भुयारी मागार्चे बरेचसे काम यंत्राद्वारे होते आहे, पण रस्त्यावरच्या कामाला मात्र बरेच मनुष्यबळ लागते. त्यात सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार असे अधिकार्यांचे मत आहे.
त्यातूनच पावसाळ्यापूर्वी करायचे म्हणून नदीपात्रातील अपुरे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला क्षअसल्याची माहिती मिळाली. वनाज ते रामवाडी या मेट्रो मागार्ची दोन स्थानके मुठेच्या पात्रातच आहे. तसेच साधारण ८०० मीटर अंतराचे ५९ खांब पात्राच्या कडेला आहेत. संगम ब्रीजजवळही नदीपात्रात मेट्रो चे काम आहे. या कामांसाठी महामेट्रो च्या ठेकेदार कंपनीने पात्रात तात्पुरता भरावही टाकला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे सगळे काम पुर्ण होऊन भराव.काढणे गरजेचे आहे. त्यामुळेच या कामाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान काम सुरू करण्यात स्थानिक अधिकार्यांची परवानगी अशीही अट आहे. त्यात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांचा समावेश आहे. कामाची परवानगी मागणारा एक सविस्तर प्रस्ताव त्यांच्यासाठी तयार करण्याचे आदेश महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी त्यांच्या स्थानिक अधिकार्यांना दिला आहे. त्यावर सध्या येथील वरिष्ठ अधिकार्यांचे काम सुरू आहे. त्यांच्याकडून प्रस्तावाचा अभ्यास, त्यातील संभाव्य धोक्यांची चर्चा होऊन प्रत्यक्ष परवानगी मिळण्यास बराच कालावधी लागेल असा महामेट्रोच्या अधिकार्यांचा अंदाज आहे.
..........................
साधारण २ हजार मजूर व १ हजार वरिष्ठ कनिष्ठ अधिकारी यांचे तब्बल महिनाभराचे कामाचे तास वाया गेलेत. काहीशे कोटी रूपयांचे हे नूकसान आहे. या काळात मजूरांची रेशनिंग पासूनची काळजी घेतली जात होती. ठेकेदार कंपनीने कामाची मुदत वाढवण्याची, नूकसान भरून देण्याची मागणी केली आहे. त्याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय होईल. काम सुरू करण्याची परवानगी मिळाली असली तरी त्यात अनेक अटी आहेत. त्या अर्थातच पाळल्या जातील. स्थानिक अधिकार्यांची परवानगी मागत आहोत. नदीपात्रातील कामच सुरू करण्यात येईल. मेट्रो कधी धावेल.हे आता सांगता येणे अवघड आहे, कोरोनाने आमचे सगळेच वेळापत्रक पुढे गेले. पण आमचा प्रयत्न काम लवकर सुरू व्हावे असाच आहे.
अतुल गाडगीळ,संचालक, महामेट्रो (वर्क)