पुरंदर विमानतळाच्या कामाला आता अधिक गती मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 08:33 PM2019-12-18T20:33:43+5:302019-12-18T20:37:55+5:30

भूसंपादन करताना येणाऱ्या अडचणी, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुणे जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालयाची आवश्यकता

The work of Purandar airport will now be going superfast | पुरंदर विमानतळाच्या कामाला आता अधिक गती मिळणार

पुरंदर विमानतळाच्या कामाला आता अधिक गती मिळणार

Next
ठळक मुद्देविमानतळाच्या कामासाठी एमएडीसीचे पुण्यात अधिकृत कार्यालय सुरुपुण्यात शिवाजीनगर येथील संचेती रुग्णालयासमोरील कुबेरा चेंबर या इमारतीत सुरु

पुणे : गेल्या तीन-चार वर्षांपासून कासव गतीने सुरु असलेल्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला आता अधिक गती मिळणार आहे. विमानतळाचे काम जलद गतीने व्हावे व विमानतळ नगारिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी)चे अधिकृत कार्यालय पुण्यात शिवाजीनगर येथील संचेती रुग्णालयासमोरील कुबेरा चेंबर या इमारतीत सुरु झाले आहे. या कार्यालयाचे समन्वय अधिकारी म्हणून दीपक नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
    राज्य शासनाने पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला मान्यता देऊन चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. परंतु अद्याप विमानतळाच्या कामाला अपेक्षित गती मात्र मिळालेली नाही. विमानतळासाठी आवश्यक जागेसाठी अद्यापही भूसंपादन सुरु झालेले नाही. विमानतळासाठी पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी अशा सात गावांमधील दोन हजार ८३२ हेक्टर जमीन संपादिक केली जाणार आहे. यात पारगाव येथील १ हजार ३७ हेक्टर, खानवडीमधील ४८४ हेक्टर, मुंजवडी गावातील १४२ हेक्टर, एखतपूर येथील २१७ हेक्टर, कुंभारवळणमधील ३५१ हेक्टर, वनपुरीतील ३३९ हेक्टर आणि उदाचीवाडी येथील २६१ हेक्टर क्षेत्रफळाचे भूंसपादन करण्यात येणार आहे. या भूसंपदानासाठी प्रत्येक गावासाठी स्वतंत्र उपजिल्हाधिका-यांची नियुक्ती करण्यात आल्या आहेत. 
    राज्य शासनाने विमानतळाच्या जागेच्या भूसंपादनासाठी तीन हजार ५१३ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. विमानतळ उभारणीसाठी सिडकोचे ५१ टक्के, एमएडीसीचे १९ टक्के, एमआयडीसी आणि पीएमआरडीएचे प्रत्येकी १५ टक्के समभाग असणार आहेत. यामुळे भूसंपादन करताना व इतर सर्व प्रकल्प पुढे घेऊन जाताना या सर्व विभागांशी समन्वय साधण्याची गरज आहे. तसेच भूसंपादन करताना येणाऱ्या अडचणी, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुणे जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालयाची आवश्यकता होती. अखेर एमएडीसी पुण्यात स्वतंत्र कार्यालय सुरु केले असून, आता विमानतळाच्या कामाला अधिक गती मिळण्यास मदत होणार आहे. 

Web Title: The work of Purandar airport will now be going superfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.