रेल्वे कुरकुंभ मोरीचे काम १५ दिवसांत सुरू होणार
By admin | Published: January 12, 2016 03:56 AM2016-01-12T03:56:34+5:302016-01-12T03:56:34+5:30
दौंड येथील रेल्वे कुरकुंभ मोरीचे काम १५ दिवसांत सुरूझाले पाहिजे, असे जिल्हाधिकारी सौरव राव यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ठणकावले.
दौंड : दौंड येथील रेल्वे कुरकुंभ मोरीचे काम १५ दिवसांत सुरूझाले पाहिजे, असे जिल्हाधिकारी सौरव राव यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ठणकावले. मोरीच्या रेंगाळलेल्या कामासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. ११) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.
बैठकीत सुळे यांनी कुठल्याही परिस्थितीत १५ दिवसांच्या आत कुरकुंभ मोरीचे काम सुरू झाले पाहिजे, असे सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला आणि कुठल्याही परिस्थितीत तातडीने कुरकुंभ मोरीचे काम सुरूझाले पाहिजे असे सांगितले. या वेळी सुळे यांनी दिल्ली येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनाही भेटणार असल्याचे सांगितले.
दौंड नगरपालिका यांच्याकडील निधी लवकरच सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करणार असल्याचे दौंड नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कापरे यांनी बैठकीत सांगितले.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता धोंगडे यांनी तांत्रिक मंजुरी घेऊन काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता आर.पी. मीना यांनीही रेल्वेच्या वतीने सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
या बैठकीला आमदार
राहुल कुल, पुणे जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अप्पासाहेब
पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)