रिंग रोडचे काम १८ महिन्यांत सुरू
By admin | Published: May 14, 2016 12:33 AM2016-05-14T00:33:46+5:302016-05-14T00:33:46+5:30
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पीएमआरडीएच्या हद्दीतील रिंग रोडसंदर्भातील सर्व प्रश्न मार्गी लावून येत्या १८ महिन्यांत प्रत्यक्ष काम
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पीएमआरडीएच्या हद्दीतील रिंग रोडसंदर्भातील सर्व प्रश्न मार्गी लावून येत्या १८ महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचा डीपीआर जुलै महिन्यात सादर झाल्यानंतर त्याला देखील राज्य शासन तत्काळ मान्यता देईल, असे आश्वासन त्यांनी
येथे दिले.
पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या प्रश्नांबाबत शुक्रवारी पुण्यात बैठक घेण्यात आली. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, पीएमआरडीएचे मुख्य कार्याकारी अधिकारी महेश झगडे, जिल्हाधिकारी सौरभ राव, दोन्ही महापालिकांचे आयुक्त, यांच्यासह अनेक संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली.
फडणवीस म्हणाले की, पीएमआरडीएच्या रिंग रोडची अलायमेन्ट आणि राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) अलायमेन्ट काही ठिकाणी एकत्र येत आहे. ज्या ठिकाणी दोन्ही अलायमेन्ट एकत्र येतात, यामध्ये काही बदल करून पीएमआरडीए तो पूर्ण करले. यामुळे रिंग रोडच्या हद्दीमध्ये काही बद्दल होणार आहेत. हे बदल करून प्रस्ताव राज्य शासनाला सादर झाल्यानंतर त्याला लवकरच मान्यता देण्यात येईल. त्यानंतर रिंग रोडचा डीपीआर करून व टेंडर करून येत्या १८ महिन्यात प्रत्येक्ष रिंग रोडचे काम सुरु करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील मेट्रो प्रकल्प पीएमआरडीएच्या वतीने करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प विकास आराखडा (डीपीआर) करण्याचे काम सुरु असून, तो जुलैअखेरपर्यंत राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे.
त्यामुळे हा अहवाल सादर झाल्यानंतर शासन तत्काळ मान्यता देईल आणि शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचा विषय देखील लवकरच मार्गी लागेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)