पावसाळ्यातही सुरू राहणार समान पाणीपुरवठा योजनेचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:08 AM2021-06-17T04:08:00+5:302021-06-17T04:08:00+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात मध्यवस्तीतील जुन्या मलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. यासोबतच समान पाणीपुरवठा ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात मध्यवस्तीतील जुन्या मलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. यासोबतच समान पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्या टाकण्याचेही काम सुरू करण्यात आले. हे काम ३० मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ही मुदत ठेकेदारांना गाठता आली नाही. प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनीही लॉकडाऊनमुळे यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध न झाल्याचे कारण देत वेळ मारून नेली. तसेच, ही कामे पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढवून दिली. मात्र, अद्यापही कामे पूर्ण झालेली नाहीत. अशा परिस्थितीमध्ये समान पाणीपुरवठा योजनेचे काम पावसाळ्यात सुध्दा सुरू राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
====
लॉकडाऊनच्या काळात शहरातील मध्यवर्ती भागातील सुमारे ४० वर्षे जुन्या २५ किलोमीटरच्या मुख्य जलवाहिन्या आणि मलवाहिन्या बदलण्याचे काम पूर्ण केले आहे. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, तसेच अन्य भागातल्या वाहिन्यांचे सुमारे १२५ किलोमीटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शिवाजी रस्ता आणि नेहरु रस्त्यावरील काम पुढील टप्प्यात केले जाणार आहे.
- नंदकुमार जाधव, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग
====
जलवाहिन्या टाकण्यासोबतच मलवाहिन्या टाकण्याचे काम करून घेण्यात आले. त्यामुळे दोनदा रस्ता खोदण्याची आवश्यकता राहिलेली नाही. पेठांमधील मलवाहिन्या खूप जुन्या झाल्या होत्या. त्या बदलणे आवश्यक होते.
- सुष्मिता शिर्के, अधीक्षक अभियंता, ड्रेनेज विभाग