सिंहगडच्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 03:11 AM2017-08-03T03:11:53+5:302017-08-03T03:11:53+5:30
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील दरडींचे नियोजन करणाºया तज्ज्ञांकडून सिंहगड घाट रस्त्यावरील दरडींचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यांच्या अहवालानुसार कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील.
खडकवासला : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील दरडींचे नियोजन करणाºया तज्ज्ञांकडून सिंहगड घाट रस्त्यावरील दरडींचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यांच्या अहवालानुसार कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील. अनेक ठिकाणी दरडी मुरमाड व ढिसूळ असून कोसळण्याच्या शक्यतेमुळे सुरक्षेच्या कारणास्तव प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सिंहगड घाटरस्ता पर्यटकांसाठी आणि वाहतुकीस सध्या बंद ठेवण्याचा निर्णय वनसंरक्षण विभागातर्फे घेतला आहे. तथापि तातडीची कामे करून रविवारपर्यंत सिंहगड पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे.
रविवारी सिंहगड घाटात दरड कोसळल्यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून, घाटात तातडीच्या उपाययोजनेस सुरुवात केली आहे. वनसंरक्षकांच्या प्रसंगावधानाने दरड कोसळूनही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, सुट्टीमुळे गडावर आलेले शेकडो पर्यटक दरड कोसळल्यामुळे अडकले होते. पावसाळा सुरू झाल्यापासून दरडप्रवण क्षेत्रावर वनविभागाचे आणि वनसंरक्षण समितीचे कर्मचारी लक्ष ठेवून असल्यामुळे रविवारी गडावरील अपघात टळला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शासकीय पातळीवर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आमदार भीमराव तापकीर, हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांच्यासह वन विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनसंरक्षण विभागाने तत्काळ कामाला सुरुवात केली आहे. गाडीवरील वाहनतळापासून खाली तीन किमी अंतरापर्यंत धोकादायक दरड आहे. या दरडीचा मलाव मुरमाड असून सिंहगडावर झालेल्या संततधार पावसामुळे ढिसूळ झाला आहे. तो अचानक कोसळू शकतो. असा धोकादायक मलाव स्वत:हून ढासळवून घेऊन १२५ अंशाच्या कोनात तिरकी भिंत केल्यास धोका कमी होऊ शकतो, असे वन विभागाचे प्रादेशिक उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी स्पष्ट केले. द्रुतगती मार्गावरील दरडींचे नियोजन करणाºया पायोनियर, स्टार आणि मेकाफेरी या एजन्सी वन विभागाच्या संपर्कात
आहेत.