भाजीपाला विकून उभारले रुग्णालय, सुभासिनी मिस्त्री यांचे कार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 01:30 AM2018-12-22T01:30:26+5:302018-12-22T01:30:40+5:30
पतीवर योग्य उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने त्यांना अवघ्या तेविसाव्या वर्षी वैधव्य आले. सोबत चार लहान मुलांची जबाबदारी होती.
पुणे : पतीवर योग्य उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने त्यांना अवघ्या तेविसाव्या वर्षी वैधव्य आले. सोबत चार लहान मुलांची जबाबदारी होती. अशा स्थितीत त्यांनी गरिबांना मोफत उपचार देण्यासाठी रुग्णालय उभारण्याचा निर्धार केला. भाजीपाला विकून, धुणीभांडी करून २० वर्षांहून अधिक काळ त्यांनी पैसे जमा केले. मुलाला अनाथालयात ठेवून डॉक्टर बनवले आणि शेवटी जमवलेल्या पैशातून ज्या गावात पतीचा मृत्यू झाला तिथेच मोठे रुग्णालय उभारले. तिथे आता गरिबांवर मोफत उपचार होत आहेत. हा निश्चयाच्या महामेरू आहेत पश्चिम बंगालच्या ७५ वर्षीय सुभासिनी मिस्त्री.
पुण्यात गुरुवारी (दि. २१) आरोग्य महोत्सव होत असून त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला व त्यांनी आपला जीवनपट उलगडला.
अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या सुभासिनी यांचे लग्न अवघ्या १२व्या वर्षी झाले. १२ वर्षे संसार आणि ४ मुले खांद्यावर असताना त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. वेळेवर त्यांच्या पतीला उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अतिशय गरीब आणि पैसे नसल्याने त्यांच्यावर ही वेळ आली. तेव्हा सुभासिनी यांचे वय २३ होते. त्याच क्षणी सुभासिनी मिस्त्री यांनी ठरवले, की असे हॉस्पिटल काढायचे ज्यात गरिबांना मोफत उपचार मिळतील. तेव्हा त्यांच्या या निर्णयावर अनेक जण हसले होते; पण ज्या गावात आपल्या नवºयाला मरण आले, तिथेच मी हॉस्पिटल काढेन, असे त्यांनी तेव्हा निक्षून सांगितले.
तेव्हा चार मुलांची जबाबदारीपण त्यांच्यावर होती. हॉस्पिटल तर सोडाच; पण स्वत:चं घर नीट करून दाखव, अशी लोकांनी त्यांची अवहेलना केली होती. पण सुभासिनी यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. ५ घरी धुण्याभांड्याची कामे करून महिन्याला १०० रुपये मिळत होते. मुलांना त्यांनी अनाथाश्रमात ठेवले आणि बाकीच्यांची जबाबदारी घेत भाजी विकायचा व्यवसाय सुरू केला. बँकेत आपले खाते सुरू केले. आपल्या मुलांचे शिक्षण आणि खर्च करून जे काही पैसे वाचले ते बँकेत टाकले. तब्बल २० वर्षे हे काम त्या प्रामाणिकपणे करीत राहिल्या.
१९९२मध्ये सुभासिनी मिस्त्री यांनी हन्सपुकूर या गावात १० हजार रुपयांना जमीन खरेदी केली. हे तेच गाव होते जिथे त्यांच्या नवºयाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या सगळ्यात लहान मुलाने आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या मेहनतीच्या जोरावर कोलकाता मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरची पदवी मिळवली होती. मग काय लोक येत गेले आणि कारवाँ बनता गया. २-३ वर्षांत ह्युमॅनिटी हॉस्पिटलने २५० लोकांना वैद्यकीय मदत दिली होती. ही मदत एकही रुपया न घेता तिथल्या डॉक्टरांनी केली होती. ज्यात सुभासिनी मिस्त्री यांचा डॉक्टर मुलगा अजय यांचा समावेश होता.
आज पूर्ण अद्ययावत रुग्णालय उभे
ह्युुमॅनिटी हॉस्पिटलचे नाव सगळीकडे पसरले आहे. त्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी अनेक लोक आणि संस्था पुढे आल्या आहेत. एका वर्षाच्या आत ह्युुमॅनिटी हॉस्पिटल ट्रस्टकडे १० पट पैसा जमा झाले. आज हे हॉस्पिटल पूर्णत: अद्ययावत असून आॅपरेशन थेटर, सोनोग्राफी, एक्स-रे आणि इतर विविध उपकरणांनी सज्ज आहे. या हॉस्पिटलच एक युनिट त्यांनी प्रथारप्रतिमा, सुंदरबन इथे सुरू केले. ज्याचा उद्देश प्रत्येक माणसाला वैद्यकीय सेवा देणे हाच आहे.
पैशाविना उपचार नाकारू नका...
भारत सरकारने त्यांच्या या कार्याचा गौरव करून यंदा त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊ केला आहे. हा पुरस्कार मिळाल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘देशातील सर्व रुग्णालयांनी रुग्ण आला तर पैसे नाहीत म्हणून त्याला परत पाठवू नये. माझ्या पतीचा या कारणाने मृत्यू झाला. इतरांचे असे होऊ नये, हीच भावना आहे.’’
साध्या वेशात स्वीकारला पद्मश्री पुरस्कार
पद्मश्री पुरस्कार स्वीकारतानासुद्धा अगदी साध्या वेशात आणि स्लीपरवर सुभासिनी मिस्त्री
राष्ट्रपती भवनात गेल्या होत्या. ‘जेव्हा आमच्या हॉस्पिटलमधून पहिला रुग्ण बरा होऊन घरी गेला, तेव्हा मला माझ्या कामाचा पुरस्कार मिळाला,’ अशा त्यांच्या भावना होत्या.