तळेगाव औद्योगिक टप्पा दोनचे काम मार्गी
By admin | Published: March 13, 2016 01:06 AM2016-03-13T01:06:09+5:302016-03-13T01:06:09+5:30
मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे, बधलवाडी, मिंडेवाडी या तळेगाव औद्योगिक टप्पा क्रमांक दोनमधील अंतिम संपादनाच्या क्षेत्रातील समुारे ४५५ हेक्टर क्षेत्रापैकी २८३ हेक्टर क्षेत्राचे संपादन करण्यात
पिंपरी : मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे, बधलवाडी, मिंडेवाडी या तळेगाव औद्योगिक टप्पा क्रमांक दोनमधील अंतिम संपादनाच्या क्षेत्रातील समुारे ४५५ हेक्टर क्षेत्रापैकी २८३ हेक्टर क्षेत्राचे संपादन करण्यात आले आहे. त्यातील जानेवारीपर्यंत २८२ हेक्टर क्षेत्राची ३३१ कोटीच्या रकमेचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित देशमुख यांनी दिली.
२००५च्या अधिसूचनेने अधिसूचित ५४६.२४ हेक्टर क्षेत्र करण्यात आले होते. परंतु, हरकतींद्वारे ९०.३८ हेक्टर क्षेत्र वगळण्यात आले. अंतिम संपादनाच्या क्षेत्रातील १७२ हेक्टर क्षेत्राचे संपादन करणे शिल्लक आहे. या क्षेत्रातील काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. तर काही वादात असल्याने त्याचे संपादन करण्यात अडचण येत असल्याचे औद्योगिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी अजित देशमुख यांनी सांगितले.
तळेगाव औद्योगिक टप्पा दोनमधील बहुतांश जमिनीचे संपादन झाल्याने आगामी काळात उद्योगांना जमिनींचे वाटप करणे शक्य होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. नुकसान भरपाई वाटपासाठी संपादन अधिकाऱ्यांना ४५० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आलेले आहे. त्यांपैकी २८२ हेक्टरचे ३३१ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आलेले आहे. तसेच काही प्रकरणे न्यायालयाच्या निर्णयावर प्रलंबित आहेत, तर काही प्रकरणांत वारसा हक्काच्या वादातील १०.५८ हेक्टर क्षेत्राच्या नुकसान भरपाईची रक्कम न्यायालयात भरण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. संहादित करण्यात येणाऱ्या जमिनीची रक्क्म ही चालू बाजारभाव किंवा रेडी रेकनर यापैकी अधिक रक्कम असणाऱ्या संख्येस १.२ने गुणल्यास येणाऱ्या रकमेचे शेतकऱ्यांस वाटप करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)