देशात लाेकशाहीचा गळा दाबण्याचे काम सुरु; शरद पवारांची भाजपवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 01:52 PM2024-03-22T13:52:03+5:302024-03-22T13:54:56+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेल्या अटकेवर यावेळी पवार यांनी जोरदार टीका केली....
बारामती (पुणे) : विरोधी अवाज दाबण्यासाठी सरकार अलिकडे ईडी, सीबीआय, आयकर सारख्या एजन्सींचा गैरवापर मोठ्या प्रमाणात करीत आहे. लोकसभा प्रक्रियेत दहशतीचे वातावरण निर्माण करणे हे लाेकशाहीवर आलेले संकट आहे. एका प्रकारे लाेकशाहीचा गळा दाबण्याचे काम सुरु आहे. यापुर्वी असे कधी घडले नव्हते, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेल्या अटकेवर यावेळी पवार यांनी जोरदार टीका केली.
बारामती येथील गाेविंदबाग निवासस्थानी पवार यांनी पत्रकारांशी बोलताना यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पवार म्हणाले, राज्याच्या प्रमुखाला अटक करण्यापर्यंत भाजप गेले आहे. सध्या चिंतेची अवस्था निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाचे बँकेचे अकाउंट सील केले आहे. त्यांचे अकाउंट गोठवल्यामुळे त्यांच्या प्रचार यंत्रणेने जे नियोजन केलेले होते, ते पूर्ण कोलमडले आहे. छपाई थांबली. लोकांचा प्रवास थांबला. बाकीच्या सुविधा या पद्धतीने त्यांचे खाते गोठवून थांबवलेल्या आहेत. एका दृष्टीने देशातील महत्त्वाच्या पक्षाला आज प्रचार करण्यासाठी साधनसामग्रीही उपलब्ध करून द्यायची नाही अशी टोकाची भूमिका प्रथमच घेतली जात असल्याचे पवार म्हणाले.
दिल्लीत भाजप शुन्यावर येणार-
केजरीवाल यांच्या अटकेबाबत पवार म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर काहीतरी कारवाई होईल, अशी शंका आधीपासूनच होती. केजरीवाल सामान्य कुटुंबातील आहेत. ते पण तीन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना ९० टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे चांगल्या माणसाला तुरुंगात टाकता. त्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार गाजवू देत नाही. हे लोकांना आवडलेले नाही. तेथील लोकांना त्यांचे नेतृत्व मान्य आहे. मोदींच्या भुमिकांना विरोध करण्याची भुमिका केजरीवाल घेतात. त्यांच्यावर झालेल्या कारवाईचे शंभर टक्के परिणाम राज्यातील जनतेवर होणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मोजक्या जागा आल्या होत्या, मात्र पुढच्या वेळी त्याही येणार नाही, अशी परिस्थिती असल्याचं वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
एजन्सींचा गैरवापर -
आतापर्यंत देशात काही अपवाद वगळता निवडणुका अतिशय मोकळ्या वातावरणामध्ये झालेल्या आहेत. मोदी सरकार आल्यानंतर यावेळची निवडणूक किती सुयोग्य वातावरणात होईल, मोकळ्या वातावरणात होईल याची शंका आम्हा सगळ्यांना आहे. त्याची काही कारणे आहेत. सरकार अलिकडे ईडी, सीबीआय, आयकरसारख्या एजन्सींचा गैरवापर मोठ्या प्रमाणात विरोधी आवाज दाबण्यासाठी करत आहे. राज्याचे प्रमुख नेत्यांविरोधात एजन्सींचा वापर करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचे पहिले उदाहरण म्हणजे झारखंडचे मुख्यमंत्री. हे आदिवासींचे राज्य आहे. आदिवासींच्या राज्यात त्यांचा अतिशय प्रभाव आहे, अशा व्यक्तीला काही वेगळ्या ऑर्डर करून चौकशी लावून त्यांना तुरुंगात टाकले आहे. आता अरविंद केजरीवाल यांनाही तसेच केले आहे, असंही पवार म्हणाले.