मराठा-ओबीसी आरक्षणावर डोकी भडकाविण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:07 AM2021-07-12T04:07:58+5:302021-07-12T04:07:58+5:30

पुणे : मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण जर सर्वच राजकीय पक्षांना मान्य आहे. तर, मग अडलेय कुठे? आरक्षण ...

Work is underway to provoke the Maratha-OBC reservation | मराठा-ओबीसी आरक्षणावर डोकी भडकाविण्याचे काम सुरू

मराठा-ओबीसी आरक्षणावर डोकी भडकाविण्याचे काम सुरू

Next

पुणे : मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण जर सर्वच राजकीय पक्षांना मान्य आहे. तर, मग अडलेय कुठे? आरक्षण का मिळत नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांकडे बोट दाखवित आहेत, यांना आरक्षणाच्या मुद्यावरून तरुण-तरुणींची डोकी भडकवायची असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

मनसेच्या नूतन शहर कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शहरप्रमुख वसंत मोरे, अनिल शिदोरे, नेते बाबू वागस्कर, महिला अध्यक्षा अ‍ॅड. रूपाली पाटील-ठोंबरे, पालिकेतील गटनेते साईनाथ बाबर, गणेश सातपुते आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात मराठा आरक्षणासाठी मोर्चा निघाला होता. या मोर्चाला राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना, भाजप अशा सर्वच पक्षांचे नेते सामोरे गेले होते. सर्वांनी त्यावेळी आरक्षणाचा मुद्दा मान्य केला होता. आजही तोच सूर आळवला जात आहे. मग नेमके अडले आहे कुठे, असा सवाल त्यांनी केला.

ओबीसी समाजाला आरक्षण देण्याबाबतही एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे. न्यायालयामध्ये बाजू का मांडली जात नाही. या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर बोलावून समाजाने विचारणा करायला हवी. मतदान करताना समाज त्यांना जाब विचारीत नाही. आरक्षणाबाबत बातम्यांमधून आणि चर्चांमधून समोर येणारी माहिती वरवरची असल्याचेही ते म्हणाले. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये कोण कोणाचा शत्रू आणि कोण कोणाचा मित्र हेच समजेनासे झाले आहे. आज वेगळेच बोलतात तर उद्या वेगळेच बोलतात असेही त्यांनी नमूद केले.

====

यंत्रणा म्हणजे बाहुल्या नाहीत

कॉंग्रेस पक्षाच्या सत्ता काळात ईडीचा गैरवापर झालेला आहे. भाजपकडूनही आत्ता गैरवापर केला जात आहे. तपास यंत्रणा म्हणजे बाहुल्या नाहीत. आपल्याला नको असलेल्या व्यक्तींना संपविण्याकरिता ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करणे चुकीचे आहे. ज्यांनी प्रत्यक्षात गुन्हे केलेत ते मोकाट सुटलेत, असे ठाकरे म्हणाले.

===

खडसेंच्या ‘सीडी’ची पाहतोय वाट

खडसेंवर कारवाई झाली तरी त्यांची सीडी बाहेर आलेली नाही. तुमच्याकडे ईडी असेल तर मी सीडी लावीन असे खडसे म्हणाले होते. त्यांच्या ‘सीडी’ची मी वाट पाहत असल्याचे ठाकरे म्हणाले.

===

...कोणासोबत जायचे ते ठरवू

येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये राज्यातील १४ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर नियोजन करू. महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यावेळच्या राजकीय परिस्थितीप्रमाणे कोणासोबत युती करायची याचा निर्णय घेईल, असेही राज ठाकरे म्हणाले.

===

राज उवाच...

1. लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारचा कारभार दिसलाच नाही. त्यामुळे समाधान कशावर व्यक्त करायचे?

2. नाना पटोले यांनी भाजपच्या कारभारासाठी इंजिनाचा दाखला दिला. पण, तुर्तास मी माझे इंजिन नीट करतोय.

3. केंद्राच्या सहकार मंत्रालय आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्याबद्दल शरद पवारांना विचारले तर अधिक सोईचे होईल.

4. नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनाही फोन केला होता. मात्र, फोन बंद होते. एक-दोन दिवसांत पुन्हा फोन करून अभिनंदन करणार.

Web Title: Work is underway to provoke the Maratha-OBC reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.