कर्जबाजारी सराफी कारागीर झाला चोरटा; दुकानदाराची नजर चुकवून १२ तोळ्याचे गंठण केले लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 12:15 PM2021-02-26T12:15:36+5:302021-02-26T12:16:40+5:30
चोरी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते.
पुणे : रविवार पेठेत त्याचे सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय होता. अनेक सराफांना तो दागिने बनवून देत असे. पण, व्यवसायात त्याला कर्ज झाले. त्यातून जादा व्याजाने एकाकडून कर्ज घेऊन दुसऱ्याला देताना तो कर्जबाजारी झाला. बोलण्यात तो पटाईत असल्याने अनेकांना बोलण्यात गुंतवून ठेवून त्याने नजर चुकवून रविवार पेठेतील लक्ष्मी गोल्ड ओर्नामेंट येथून १२ तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरले होते. खडक पोलिसांनी त्याला अटक केली. तेव्हा त्याचा हा पूर्व इतिहास समोर आला. विनय प्रकाश पावटेकर (वय ३९, रा. सिडको तेरणा हायस्कुलजवळ, औरंगाबाद) असे त्याचे नाव आहे.
याप्रकरणी रोहित बाबर यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार १२ फेब्रुवारी रोजी दुपारी घडला होता. चोरी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. त्यानुसार तपास करत असताना पोलीस नाईक सागर केकाण यांना ही चोरी पावटेकर याने केली असून तो शनि मारुतीजवळ आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीचा शोध घेऊन पावटेकर याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सोन्याचे गंठण आटवून ती लगड कोथरुड व औरंगाबाद येथे ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १० तोळ्याची लगड जप्त केली आहे.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे, सहायक निरीक्षक सुशिल बोबडे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम मिसाळ यांच्या पथकाने केली.