भादलवाडी येथील कामगाराचा आजारपणामुळे मृत्यू, कंपनीने दुर्लक्ष केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 12:06 AM2019-02-08T00:06:49+5:302019-02-08T00:07:38+5:30
नीरा-भीमा स्थिरीकरणांतर्गत नदीजोड प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. अकोले, भादलवाडी या ठिकाणी या प्रकल्पांतर्गत बोगद्याचे काम सुरू आहे.
पळसदेव - नीरा-भीमा स्थिरीकरणांतर्गत नदीजोड प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. अकोले, भादलवाडी या ठिकाणी या प्रकल्पांतर्गत बोगद्याचे काम सुरू आहे. दरम्यान, भादलवाडी येथे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी बुधवारी (दि. ६) दुपारी एका कामगाराचा अचानक मृत्यू झाला. दरम्यान गेले तीन दिवस हा कामगार आजारी असल्याचे सांगितले जात असून, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तेथील कामगारांनी केला आहे.
राकेशकुमार श्रीकुमार झारीया (वय ४५, रा. जबलपूर, मध्य प्रदेश) असे मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव आहे. राकेशकुमार याचा मृत्यू आजारपणामुळे झाला असे सांगितले असले तरीसुद्धा त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याने त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
दरम्यान जोपर्यंत कंपनीचे अधिकारी या ठिकाणी येत नाहीत, तसेच या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात येणार नाही, तोपर्यंत मृतदेहाला हात लावू दिला जाणार नाही असा पवित्रा कामगारांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
गेले तीन दिवस कामगार मृत्यूशी झुंंजत असताना एकही अधिकारी फिरकला नाही. त्यामुळेच त्याला वेळीच उपचार मिळाले नाहीत असाही आरोप कामगरांनी केला. पोलीस आल्यावरही सुमारे अर्धा तास मृतदेहाला हात लावू
दिला नाही.
त्यामुळे अखेर भिगवणचे पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस कर्मचारी सातपुते, राऊत, यांनी या ठिकाणी आपली फिर्याद लिहून घेण्याचे आश्वासन दिले. त्या वेळी कामगार शांत झाले.
दुपारी बारा ते सायंकाळी सहापर्यंत मृतदेह पडून
दुपारी बारा वाजता मयत झालेल्या कामगाराचा मृतदेह सायंकाळी सहा वाजेपर्यंत तसाच होता. परंतु दिवसभर कंपनीचा एकही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. दुपारी तीन वाजता जलसंपदा खात्याचा एक अधिकारी व इतर कंपनीचे कनिष्ठ अधिकारी आले. दरम्यान दिवसभर बोगद्याचे काम बंद होते. अखेर पोलिसांनी फिर्याद लिहून घेतल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनाठी हलविण्यात आला.