इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 18:55 IST2023-01-20T18:55:20+5:302023-01-20T18:55:51+5:30
सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेट, जाळी, सेफ्टी बेल्ट असे साहित्य पुरवणे आवश्यक असताना ठेकेदाराने निष्काळजीपणा केला

इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू
धनकवडी : जलवाहिनीचे काम करताना अकराव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (१८) दुपारीच्या सुमारास घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात ठेकेदार आणि घरमालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील भीमराव शिंगाडे (वय २७ वर्षे, रा. लक्ष्मी नगर, डहाणूकर कॉलनी) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. पोलिस अंमलदार नंदलाल भादले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठेकेदार सुधाकर शंकर पवार (वय ३६ वर्षे, राहणार डहाणूकर कॉलनी) आणि घरमालक हेमंत भोंगळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ परिसरातील लेकटाउन सोसायटी येथे बुधवारी दुपारी १२.३० वाजता अकराव्या मजल्यावर जल वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. शिंगाडे यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेट, जाळी, सेफ्टी बेल्ट असे साहित्य पुरवणे आवश्यक असताना ठेकेदाराने निष्काळजीपणा केला. दरम्यान काम करताना तोल गेल्याने शिंगाडे अकराव्या मजल्यावरील झुल्यावरून खाली पडले. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. शिंगाडे यास उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपाचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अविनाश ढमे करीत आहेत.