Pimpri Chinchwad: क्रशर प्लांटवर जिलेटिनच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू, फुटींग होल घेताना अपघात
By नारायण बडगुजर | Updated: April 29, 2024 15:11 IST2024-04-29T15:10:45+5:302024-04-29T15:11:28+5:30
खेड तालुक्यातील करंजविहीरे गावातील नवीन स्टोन क्रशर प्लांटवर शनिवारी (दि. २७) सकाळी सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली....

Pimpri Chinchwad: क्रशर प्लांटवर जिलेटिनच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू, फुटींग होल घेताना अपघात
पिंपरी : फुटींग होलचे काम सुरू असताना ट्रॅक्टरच्या काॅम्प्रेसरचा स्फोट झाला. त्यानंतर जिलेटिनचा स्फोट होऊन कामगाराचा मृत्यू झाला. यात दोन कामगार गंभीर जखमी झाले. खेड तालुक्यातील करंजविहीरे गावातील नवीन स्टोन क्रशर प्लांटवर शनिवारी (दि. २७) सकाळी सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली.
राजेश कुशवाह असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. रमेश मोतीलाल कोल (३५, रा. जामूल तोला, ता. अमृत पाटन, जि. सतना, मध्य प्रदेश) आणि आलोक कोल हे दोघेजण गंभीर जखमी झाले. स्वप्नील बाबाजी कोळेकर, नीलेश सदाशिव कोळेकर, बाबाजी रामदास कोळेकर (तिघे रा. करंजविहीरे, ता. खेड), रवींद्र अरुण तोत्रे (रा. वडगाव पाटोळे, ता. खेड) या सशंयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील रवींद्र तोत्रे याला पोलिसांनी अटक केली. पोलिस उपनिरीक्षक किरण शिंदे यांनी याप्रकरणी रविवारी (दि. २८) म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हे कॉम्प्रेसर ट्रॅक्टरने फुटींग होल घेण्याचे काम करतात. त्यांच्याकडे रमेश कोल, आलोक कोल आणि राजेश कुशवाह हे काम करत होते. संशयितांनी त्यांच्याकडे जिलेटीन देखील बाळगले होते. त्यांनी कामगारांना कोणतेही प्रशिक्षण न देता त्यांच्याकडून सदोष कॉम्प्रेसरने फुटींग होलचे काम करून घेतले. फुटींग होलचे काम सुरू असताना शनिवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास ट्रॅक्टरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन त्यावरील जिलेटीनचा देखील स्फोट झाला. यामध्ये कामगार राजेश कुशवाह यांचा मृत्यू झाला. तर आलोक कोल आणि रमेश कोल हे दोघे गंभीर जखमी झाले.