ऊसतोडणी सुरु असताना कामगाराला सर्पदंश झाला, विष उतरवण्यासाठी मांत्रिक बोलावला; अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 07:12 PM2020-12-30T19:12:34+5:302020-12-30T19:34:02+5:30
रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात मांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : वाघाळे ( ता. शिरूर ) येथे शेतात ऊसतोड सुरु असताना एका कामगाराला सर्पदंश झाला. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली. मात्र सर्पदंश झालेल्या कामगारावर रुग्णालयात सुरू असलेले उपचार बंद करत मांत्रिकांमार्फत मंत्र व लिंबांचा वापर करत अघोरी विद्येचा प्रयोग करण्यात येत होता. मात्र हा जीवावर बेतणारा प्रकार अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उधळून लावला. व त्या कामगाराला पुन्हा एकदा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात या मांत्रिकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात असून त्याला अटक देखील केली आहे.
पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील वाघाळे येथे ऊसतोड करत असताना अंकुश वाघ यांना विषारी सापाने दंश केला. त्यावेळी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र याचदरम्यान अंकुश यांच्यावरील सुरू असलेले उपचार बंद करून मांत्रिकाच्या माध्यमातून विष उतरविण्यासाठी नातेवाईकांनी मांत्रिक जयवंत शिंदे (वय 78) याच्याकडे नेण्यात आले. यावेळी या मांत्रिकाने सर्पदंश झालेल्या कामगाराचे डोक्याचे केस ओढत त्याच्यावर मंत्र म्हणत लिंबांचे पूजन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी मांत्रिकाचा कामगारावर सुरु असलेला जादूटोण्याचा जीवघेणा प्रयोग हाणून पाडला. तसेच अघोरी विद्येचे प्रयोग करणाऱ्या मांत्रिकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. मांत्रिक जयवंत शिंदे याच्यावर जादूटोणा प्रतिबंध उच्चाटन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव म्हणाल्या, मांत्रिकाच्या सहाय्याने अंधश्रद्धेपोटी मंत्र, तंत्र, गंडे, दोऱ्याचा वापर करत नागरिकांची फसवणूक केली जात आहे. मात्र अशा प्रकारे अघोरी उपचार करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करताना जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे.
.