कामगारांचे आंदोलन चिघळले
By admin | Published: May 9, 2016 12:49 AM2016-05-09T00:49:52+5:302016-05-09T00:49:52+5:30
कंपनीकडून कामगारांवर झालेल्या अन्यायाबाबत आवाज उठविण्यासाठी आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार दिनीच ४०० कामगार उपोषणास बसले आहेत
कोरेगाव भीमा : सणसवाडी आणि पिंपळे जगताप येथील दोन युनिटमध्ये असलेल्या इनोव्हेटिव्ह इंडस्ट्रीज लि. कंपनीकडून कामगारांवर झालेल्या अन्यायाबाबत आवाज उठविण्यासाठी आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार दिनीच ४०० कामगार उपोषणास बसले आहेत. पर्याय न निघाल्याने व २३ कामगारांना रुग्णालयात दाखल केल्याने आज कामगारांच्या पत्नींनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.
सणसवाडी येथे सात दिवसांपासून ४०० कामगार राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास बसलेले आहेत. कंपनी व्यवस्थापक चंदू चव्हाण याकडे दुर्लक्ष करत असून, २३ कामगारांना रुग्णालयात दाखल केले आहे. कंपनी व्यवस्थापक याकडे फिरकले नसल्याने आज अचानक अनेक कामगारांच्या महिलांनी लहान मुलांसह शिक्रापूर पोलीस ठाणे गाठले.
कंपनी व्यवस्थापकास आमच्या समोर हजर करा, अशी मागणी करत पोलीस ठाण्यातच तब्बल चार तास ठिय्या मांडला. या वेळी महिलांनी कंपनी प्रशासना विरोधात घोषणा देत ठिय्या मांडला. पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी कंपनी व्यवस्थापकाशी फोनवर चर्चा करून कामगारांच्या प्रश्नांबाबत उद्या बैठक घेण्याचे सांगितले. महिलांनादेखील याबाबत उद्या सकाळी दहाच्या सुमारास तातडीची बैठक घेऊन कामगारांबाबत निर्णय घेण्याच्या सूचना व्यवस्थापकास केल्या असल्याचे सांगितले.
परंतु, कंपनी व्यवस्थापकामुळे आमच्या पतींना उपोषणास बसण्याची वेळ आली असल्याने त्यांची प्रकृती आता चिंताजनक झालेली असून, त्यांना कंपनी व्यवस्थापक आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे, त्यामुळे चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करा व अटक करा, अशी मागणी त्यांनी केली.
संतप्त महिला काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. फक्त चव्हाण यांना समोर आणा किंवा अटक करा, या भूमिकेवर ठाम राहिल्या. यानंतर यशवंत भोसले पोलीस स्टेशन येथे आले आणि त्यांनीदेखील महिलांना उद्या बैठक आयोजित केलेली असून यातून काही निर्णय नक्कीच निघणार असल्याचे सांगितले व आता महिलांनी येथून उठावे, अशी विनंती केली. तरीही महिला ऐकण्याच्या स्थितीत नव्हत्या.