संचारबंदी आणि जमावबंदीच्या विरोधात कामगार आणि व्यापाऱ्यांनी मोर्चासाठी जमावे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 12:28 PM2021-04-07T12:28:55+5:302021-04-07T12:29:48+5:30
पुणे कॅम्प मर्चंट असोसिएशनतर्फे मोर्चाचे आयोजन आयोजन
पुणे: लष्कर-राज्य सरकार, आणि पुणे महापालिकेच्या अध्यादेशाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने अध्यादेश काढत नियमावली जाहीर केली. परंतु काल सकाळपासूनच कॅम्प भागातील व्यापारी आणि कामगार यांच्या मनात गोंधळाचे वातावरण दिसत होते. त्यामुळे काल सकाळी दुकाने अर्धवट सुरू ठेवून मालक व कामगार दुकानाच्या बाहेर थांबलेले दिसले.
परंतु काल रात्री अचानक सामाजिक माध्यमांवर दिनांक ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता बाटा चौक येथे सर्व कामगार व व्यापारी यांनी मोर्चासाठी जमावे या आशयाचा संदेश फिरत असल्याचे दिसून आले. याबद्दल येथील पुणे कॅम्प मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष पराग शाह यांनी अशा कुठल्याही प्रकारच्या मोर्चाचे आयोजन केले नसल्याचे सांगितले.
त्यानंतर येथील लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनाही येथील व्यापारी व असोसिएशन चे पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यावेळी सुद्धा कुठलाही मोर्चा होणार नसल्याचे सांगण्यात आले.
कदम म्हणाले की, कोणीही बाटा चौकात जमू नये. जमावबंदी आदेश लागू असून सर्वांनी कायद्याचे पालन करावे, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये.