कामचुकारांच्या हाताला बँड, 'कष्ट'टाळू कर्मचाऱ्यांना चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 01:59 AM2018-09-01T01:59:12+5:302018-09-01T01:59:36+5:30
उपमहापौरांची सूचना : काम केले की नाही ते कळणार
पुणे : कामचुकार स्वच्छता कर्मचाऱ्यांवर यापुढे कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्या हाताला डिजीटल बँड बांधण्यात येणार असून त्यामुळे ते कुठे व कोणते काम करीत आहेत, याची माहिती प्रशासनाला त्याच वेळी समजणार आहे. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रशासनाला ही सूचना केली असून, त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
एरवी स्वच्छता कर्मचाºयांच्या हक्कांबाबत जागृत असणारे डॉ. धेंडे यांनी कामचुकार कर्मचाºयांना चाप लावणेही महत्त्वाचे समजले आहे. काही स्वच्छता कर्मचारी कामावरच येत नाहत्त, उपस्थिती लावत नाहीत. दोन-चार दिवसांनी येऊन नंतर हजेरी लावतात. अशा काही गोष्टी वारंवार निदर्शनास येऊ लागल्यानंतर डॉ. धेंडे यांनी चौकशी केली असता विशिष्ट कर्मचारी असे प्रकार करतात. त्यासाठी मुकादमावर दबाव आणतात, हे त्यांना समजले. अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली व राजेंद्र निंबाळकर यांच्या लक्षात त्यांनी ही गोष्ट आणून दिली. घनकचरा व्यवस्थापनाचे सहायक आयुक्त सुरेश जगताप यांच्याशीही चर्चा केली. त्या वेळी नागपूर महापालिकेने सर्वच स्वच्छता कर्मचाºयांच्या हाताला डिजीटल बँड बांधले असल्याचे त्यांना समजले. हे बँड हाताला लावून काम करणे सक्तीचे आहे. त्यातून काम केलेल्या परिसराची छायाचित्रेही पाठविण्याची व्यवस्था आहे. तसेच, काम कुठे करत आहे, वेळ कोणती आहे, याचीही माहिती वरिष्ठांना समजते.
त्यानंतरच पुणे महापालिकेच्या कर्मचाºयांनाही असेच बँड लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची साधारण किंमत २५० ते ५०० रुपये असल्याचे प्राथमिक चौकशीत समजले आहे. एकूण किती बँड लागतील, खर्च किती येईल वगैरे माहिती तयार करून त्याची निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती समजली. या कर्मचाºयांसाठी बायोमेट्रिक हजेरीची व्यवस्था केली होती; मात्र त्याचा वापर नीट केला गेला नाही. त्या यंत्राच्या काचा फुटल्या व ती नादुरुस्त झाली. त्यानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन झाले होते. आता मात्र डिजीटल बँडमुळे त्याला आळा बसणार आहे.